राष्ट्रकवी कुवेंपू हे 20 व्या शतकातील सर्वात मोठे प्रतिभावंत होते. त्यांनी मानवी समाजाला एक चांगला संदेश देऊन आपल्या प्रतिभेने कन्नड साहित्य समृद्ध केले आहे. त्यांचे सतत स्मरण करणे आवश्यक आहे, असे व्याख्याते टी. एस. वंटगुडी यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग तसेच बेळगाव महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात आज कुमार गंधर्व कला मंदिर येथे जागतिक मानव दिन सोहळा कार्यक्रम पार पडला.
कुवेंपू जयंतीनिमित्त बोलताना, प्रमुख व्याख्याते टी. एस. वंटगुडी म्हणाले की, कुवेंपू यांनी आपल्या साहित्यातून नेहमी सत्याचा शोध घेतला. आत्म्याला महत्त्व देऊन आत्म्याच्या विकासासाठी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली. मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील नाते हे अनाकलनीय आहे, अध्यात्मिक साध्य हेच मानवी ध्येय असले पाहिजे, असे त्यांच्या साहित्यातून दिसून येते. कुवेंपू यांनी शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही मोठे काम केले आहे. कन्नड भाषेला जी शक्ती दिली, तिचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उप संचालिका विद्यावती भजंत्री, श्रीरंग जोशी आदी उपस्थित होते.


Recent Comments