Belagavi

देवही राहिले नाहीत सुरक्षित! उद्यमबागमधील दत्त मंदिरात चोरी

Share

या कलियुगात देवही सुरक्षित राहिले नाहीत याची प्रचिती देणारी घटना बेळगावातील उद्यमबागमध्ये आली आहे. दत्त जयंतीला दोन दिवसही उलटले नसतानाच येथील राजाराम नगरातील दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरटयांनी सुमारे ७० ते ८० हजार रुपये दान रकमेवर डल्ला मारलाय.

होय, गेल्या काही महिन्यात बेळगाव शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या, चोऱ्यांच्या घटनांत वाढ झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तशातच दत्त जयंतीला दोन दिवसही उलटले नसतानाच येथील राजाराम नगरातील दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरटयांनी सुमारे ७० ते ८० हजार रुपये दान रकमेवर डल्ला मारलाय. विशेष म्हणजे, दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद संपल्यावर रात्री बारापर्यंत मंदिर समितीचे सदस्य चर्चा करून घरी गेले. त्यानंतर अवघ्या दोन तासात चोरटयांनी आपला डाव साधलाय.

मंदिराची दानपेटी रॉडच्या साहाय्याने फोडून त्यात गेल्या दोन-तीन दिवसात जमा झालेली दानाची ७० ते ८० हजारांची रक्कम चोरटयांनी लांबवली आहे.  या संदर्भात मंदिर समितीचे पदाधिकारी व वॉर्ड क्र. ५३ चे नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांनी इन न्यूजला माहिती देताना सांगितले की, दत्त जयंतीनिमित्त मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

काल तिसऱ्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यानंतर सर्व आवराआवर करून मंदिर समितीचे पदाधिकारी व सदस्य रात्री १२ वाजेपर्यंत चर्चा करीत होते. त्यानंतर ते घरी गेल्यावर रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून सुमारे ८० हजारांची रक्कम लांबवली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि चोऱ्यांवर नियंत्रण मिळवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना मंदिर समितीच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भजन, कीर्तन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम गेले ३ दिवस सुरु होते. काल तिसऱ्या दिवशी महाप्रसाद आटोपून रात्री १२ पर्यंत आम्ही सदस्य हिशेब बुके तपासून पुशिलं वर्षी कोणते कार्यक्रम घ्यायचे याची चर्चा करून घरी गेलो.

त्यानंतर २ ते ३ वाजण्याच्या सुमारास २-३ चोरटयांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून ही चोरी केली आहे. २ महिन्यांपूर्वी याच मंदिरात समया व अन्य वस्तूंची चोरी करण्यात आली होती. त्याबाबत पोलीस स्थानकात तक्रारही दिली आहे. त्याचा तपास अजून लागला नसतानाच दुसऱ्यांदा येथे धाडसी चोरी झाली आहे. पोलीस आम्हाला येथे झोपायला सांगतात. पण सरकारने त्यांना वाहनांसह सर्व सोयी-सुविधा दिल्या आहेत. मग त्यांनी रात्रीची गस्त का घालू नये? असा संताप व्यक्त करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला.

जीआयटी रोडवरील रहिवासी बापू सातगौडा यांनी सांगितले की, २ ते ३ चोरटयांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसते. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविल्यास ते जेरबंद होऊ शकतात. पण पोलसांनी ही घटना गांभीर्याने घेऊन तपास केला पाहिजे असे यांनी सांगितले.

एकंदर, दत्त जयंतीनिमित्त ३ दिवस भक्तांच्या वर्दळीने गजबजलेल्या राजाराम नगरातील दत्त मंदिरात चोरी करून चोरटयांनी कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ दिवस मंदिराची रेकी करूनच चोरटयांनी ही धाडसी चोरी केली आहे. पोलिसांनी आता हे आव्हान पेलून चोरट्याने गजाआड करण्याची मागणी राजाराम नगरातील रहिवाशांनी केली आहे. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Tags: