मानवाने जीवन कसे जगावे, जन्म कसा सार्थकी लावावा याचे अचूक मार्गदर्शन भगवद्गीतेत केलेले आहे, असे प्रतिपादन विविध स्वामीजी आणि मान्यवरांनी बेळगावात आज भगवद्गीता अभियानाच्या समारोपप्रसंगी केले.
बेळगाव जिल्ह्यात महिनाभर चाललेल्या भगवद्गीता अभियानाचा भव्य समारोप सोहळा आज सायंकाळी बेळगाव शहरातील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर विविध मठांचे स्वामीजी, आमदार, लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिकांच्या भव्य उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. फ्लो
यावेळी बोलताना भगवद्गीता अभियानाचे प्रणेते व सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थान मठाचे मठाधिपती श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्रीमद गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजी म्हणाले की, बेळगावात श्रीभगवद्गीता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले आहे. भगवद्गीता अभियान 17 दिवस सुरू राहून राज्यातील जिल्ह्यांचा दौरा करून आज येथे आले. पूर्वी बेळगाव शहरात 2 मोठे कार्यक्रम झाले होते. समारोपाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात होत आहे. बेळगाव भगवद्गीता अभियानात अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झाले आहेत, असे ते म्हणाले.
भारताला जगाचा गुरु बनवायचे आहे, त्यानुसार तयारी करावी लागेल. भगवद्गीता जीवनात अंगीकारता येईल अशी तत्त्वे देते. अनेक संतांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून या भगवद्गीता मोहिमेत दहावा अध्याय शिकवला जात आहे. 10वा अध्याय वाचल्यास आपण देव कुठे पाहू शकतो हे लक्षात येते.

उडुपी श्री पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी सांगितले की, समाजात राहून आणि दैनंदिन कामे करून आपण आध्यात्मिक साधना करू शकतो. त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. आध्यात्मिक प्राप्ती वेगळी आणि लौकिक जीवनातली प्राप्ती वेगळी आहे. ज्याची आपण देव मानून पूजा करतो, त्याच्या कृपेची जेव्हा आपल्याला गरज असते, तेंव्हा सिद्धी हवी असते. सिद्धी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्तव्य करत राहणे. यश मिळवण्यासाठी प्रत्येकाने व्यवसायाला चिकटून राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
भगवद्गीता अभियानाच्या भव्य समारोप कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, भारत आज अनेक क्षेत्रात पुढे जात आहे ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. भारत ही जगातील 5वी मोठी आर्थिक शक्ती बनली आहे. आपला भारत सर्व बाबतीत पुढे गेला आहे. मोबाईल उत्पादन व निर्यातीत आम्ही आघाडी घेतली आहे, जगात सर्वात जास्त गुंतवणुकीचे ठिकाण भारत बनला आहे, आपला भारत विकसनशील देशातून विकसित देशात बदलला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले की, श्रीमद भगवद्गीता जगातील अन्य कोणत्याही धर्मग्रंथांपेक्षाही श्रेष्ठ आहे. जगातील आघाडीच्या परदेशी वैज्ञानिकांनी भग्वद्गीतेपासून प्रेरणा घेतली, संशोधन केले आहे. याचे त्यांनी स्वतः सांगितलेले पुरावेही उपलब्ध आहेत. त्या वैज्ञानिकांना कोणी हिंदू धर्मात बोलावले नव्हते, स्वयंप्रेरणेने त्यांनी भग्वद्गीतेपासून प्रेरणा घेतली आणि महान शोध लावले. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत “स्वधर्मे निधनो श्रेय, परधर्म भयावह” असे सांगितले आहे.
आपल्या धर्माचे अर्थात कर्तव्यांचे नीट पालन करा, कोणतीही समस्या येणार नाही असे या संदेशाचे सार आहे. भग्वद्गीतेच्या या संदेशाचे पालन करून भारताला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आजच्या वर्तमानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार मंगल अंगडी, अरविंदराव देशपांडे, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments