मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल हिजाबच्या मुद्द्यावरून बेजबाबदार विधान केले होते. पुन्हा हिजाब घालू देणार असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्राला कलुषित करण्याचे काम खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हाती घेतले हे या राज्याचे दुर्दैव असल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.
दिल्लीत शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना विजयेंद्र म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून अशा विधानाची कोणालाच अपेक्षा नव्हती. किमान शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे काम राज्य सरकारने करायला हवे होते. एकीकडे हिजाब घालू देणार असे सांगणारे मुख्यमंत्री दुसरीकडे हे काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना विद्यार्थी, महिला विद्यार्थिनी आणि मातांना मंगळसूत्र, जोडवी काढा असे सांगतात.
राज्य सरकारचे हे वर्तन खरोखरच धक्कादायक आहे. भाजप याचा तीव्र निषेध करतो. काँग्रेसवाले केवळ अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात. त्यांच्या तुष्टीकरणाचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे सांगून ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर 50 ते 60 वर्षे काँग्रेस पक्षाने देशावर व राज्यात राज्य केले आहे. मात्र, आजही 50 टक्के अल्पसंख्याक शिक्षणापासून वंचित आहेत, त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी केली.
या देशाचे अभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक अल्पसंख्याक महिलेने सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगले पाहिजे, या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक रद्द केला आहे. तुम्ही काय केले आहे? असा प्रश्न विजयेंद्र यांनी विचारला. तुम्ही फक्त अल्पसंख्यांकांबद्दल बोलता. त्यांच्यासाठी काही योजना आणल्या आहेत का, असे विचारले. बेरोजगारीसह अल्पसंख्याकांच्या अनेक समस्यांना काँग्रेस जबाबदार असल्याचा आक्षेप त्यांनी केला.
‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण काँग्रेसने पूर्वीपासून अवलंबले आहे. इंग्रजांच्या आक्रमण धोरणाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे श्रेय काँग्रेस पक्षालाच आहे, असे ते म्हणाले. गेली ५ वर्षे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले. ज्या वेळी पुन्हा सत्ता मिळणे कठीण आहे, असे दिसले त्या वेळी वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे धर्म आहेत, असे सांगून आग लावली. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला सरकार प्रतिसाद देत नाही. ती जबाबदारी राज्य सरकार विसरले आणि लोकसभा निवडणुकीत 20 मतदारसंघ जिंकण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
बेळगावात एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करणे, शाळकरी मुलांकडून स्वच्छतागृह साफ केल्याच्या घटना कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची चिन्हे आहेत. राज्यात मुख्यमंत्री आहे का? मंत्री आहे का? असे प्रश्न पडले आहेत. दुष्काळ असूनही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली नाही. एकीकडे हे बेजबाबदार वर्तन असेल तर दुसरीकडे हिजाब घालण्याची परवानगी देणार असल्याचे सांगून वाद निर्माण करत आहेत. हिंदू महिलांचे मंगळसूत्र आणि जोडवी काढण्याचे आवाहन केले जाते. तुमचा उद्देश तरी काय आहे? असा सवाल विजयेंद्र यांनी केला. जनतेत फूट पाडण्याचे धोरण सोडून द्या; तुम्ही साडेसहा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा, असा परखड सल्ला विजयेंद्र यांनी दिला.


Recent Comments