Belagavi

शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम साखर कारखान्यांनी करावे : शिवानंद पाटील

Share

एक काळ असा होता की देशात साखर आयात केली जात होती. मात्र आता ऊस हे पीक देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणारे महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी साखर कारखान्यांनी काम करावे, असे आवाहन मंत्री शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.

बेळगावात शुक्रवारी एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये गोदावरी साखर कारखाना, निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या बीएस्सी अभ्यासक्रमात 2022-23 या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक गुण आणि रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. संस्थेच्या बीएस्सी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक सुप्रीत पिरगन्नवार, द्वितीय क्रमांक सूरजसिंग चोपदार व तृतीय क्रमांक अभिनंदन पाटील यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच उत्तर-पश्चिम विभागातील शिवशक्ती शुगर्स, संकनट्टीच्या कृष्णा, मुनवळ्ळीच्या रेणुका शुगर्स कारखान्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आली.

पुरस्कार दिल्यानंतर बोलताना मंत्री शिवानंद पाटील म्हणाले की, जगाच्या कृषी क्रांतीमध्ये ऊस पिकाची भूमिका लक्षणीय आहे. साखर कारखान्यांना आणखी 100 वर्षे उज्ज्वल भवितव्य आहे. कारखान्यांमधून स्थानिकांना नोकरीची संधी मिळाली. या उद्योगातून राज्य सरकारला सुमारे २५ हजार ते ३५ हजार कोटींचे उत्पन्न मिळत आहे. ऊस लागवडीत राज्य आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढच्या दिवसात आपण प्रथम क्रमांक पटकावणार आहोत. शेतकऱ्याला जास्त उत्पन्न देणारे ऊस हे एकमेव पीक आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून शास्त्रोक्त शेती पद्धतीचा अवलंब करावा. एकरी ५ टन ऊस पिकवल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. असे प्रयत्न करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.


बेळगाव एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आर. बी खंडगावे, एस. निजलिंगप्पा साखर महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश पट्टन, ऊस विकास आयुक्त तथा साखर संचालक एम. रविकुमार, मंडळ सदस्य अजित देसाई, अशोक पाटील, मल्लिकार्जुन हेगलगी व व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: