Belagavi

यावर्षी ७० ते ९० हजार पंपसेट्स अधिकृत करण्याचा निर्णय : ऊर्जामंत्री जॉर्ज

Share

आवश्यक तेथे उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह अक्रम-सक्रम योजनेत यावर्षी ७० ते ९० हजार पंपसेट्स अधिकृत करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी दिले.

हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कागवाडचे आमदार राजू उर्फ भरमगौडा कागे यांनी ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्याच्या समस्येमुळे आणखी डोकेदुखी वाढली आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरस्त करून बसवले जातात. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी ते पुन्हा नादुरुस्त होतात. त्यामुळे समस्या जैसे थे राहते. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यापेक्षा नवे, उच्च क्षमतेचे अपग्रेड केलेले ट्रान्सफॉर्मर बसवावेत अशी मागणी त्यांनी केली.

या विषयावर बोलताना आ. सिद्धू सवदी यांनी, मागील सरकारने शेतकऱ्यांना मोफत टीसी बसवून देण्याची योजना आखली होती. ती या सरकारनेही सुरु ठेवण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अक्रम-सक्रम योजनाही सुरु ठेवण्याची मागणी केली. ट्रान्सफॉर्मर, पंपसेट्स बसविण्याचा सर्व खर्च ऐन दुष्काळात शेतकऱ्यांवर टाकू नका. किमान ५०:५० तत्वावर सरकार व शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा खर्च उचलण्याची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी, कुमारस्वामी-येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना २००४ मध्ये अक्रम-सक्रम योजना राबवण्यात आली होती. त्यावेळी ३० हजार शुल्क आकारण्यात येत होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी थेट वीज खांबावर हुक टाकून वीजजोडणी घेण्यास प्रारंभ केला होता. २०१० ते २०२३ दरम्यान अक्रम-सक्रम योजनेवर ६ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्प परवडतात. पण यंदा पावसाअभावी तेथे उत्पादन कमी आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने पवनचक्की आणि सौरऊर्जा उत्पादनही घटले आहे.

अचानक सगळ्या अडचणी येऊन उभ्या ठाकल्याने वीज निर्मिती रोडावली. त्यामुळे कृषी पंपसेट्सना ७ ऐवजी ५ तास वीज पुरवठ्याचा निर्णय मुख्यमंत्र्याना घ्यावा लागला. या दरम्यान, विजेचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु आम्ही उत्तर प्रदेश आणि पंजाबकडून बार्टर पद्धतीने वीज घेतली. त्याशिवाय केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन विजेची मागणी केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आमची मागणी पूर्ण केली. सध्या राज्यात विजेची टंचाई तीव्र नाही. शेतकरी ५ पंपसेट्स लावायच्या ठिकाणी १५ पंपसेट्स लावत असल्याने ट्रान्सफॉर्मर जळून खाक होण्याची समस्या उदभवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर आ. राजू कागे यांनी, बेकायदा पंपसेट्सवर कारवाई करा, उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवा अशी सूचना केली. फ्लो
त्यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री जॉर्ज यांनी टप्प्याटप्प्याने बेकायदा पंपसेट्स अधिकृत करण्यात येतील. अक्रम-सक्रम योजनेत यावर्षी ७० ते ९० हजार पंपसेट्स अधिकृत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

Tags: