Belagavi

श्री प्रभावती सौहार्द सहकारी संघ, प्रभाताई फौंडेशनचे शानदार उदघाटन

Share

समाजसेवेसोबतच महिला आणि गोरगरिबांच्या आर्थिक, सामाजिक उत्थानाच्या हेतूने प्रारंभ केलेल्या श्री प्रभावती सौहार्द सहकारी संघ आणि प्रभाताई फौंडेशनचे बुधवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य समारंभात शानदार उदघाटन करण्यात आले.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील वडगाव येथील सोनार गल्लीतील संस्थेच्या मुख्यालयात बुधवारी सायंकाळी शानदार समारंभात श्री प्रभावती सौहार्द सहकारी संघ आणि प्रभाताई फौंडेशनचे उदघाटन करण्यात आले. लिंगायत पंचमसाली कुडलसंगम पीठाचे जगद्गुरू श्री बसवजय मृत्यूंजय महास्वामीजी, जुनी हुबळी नीलकंठ मठाचे श्री शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री एम. मल्लिकार्जुन नागपन्नवर, काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी, स्वाती किडवाल, अनंतकुमार ब्याकुड, काँग्रेस नेते प्रदीप एम. जे., फौंडेशन आणि संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा प्रभावती मास्तमर्डी, उपाध्यक्ष गिरीराज झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रभावती मास्तमर्डी यांच्याहस्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पहार अर्पण करून सत्कार करून स्वागत करण्यात आला. त्यानंतर स्वामीजी, मंत्री जारकीहोळी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने श्री प्रभावती सौहार्द सहकारी संघ आणि प्रभाताई फौंडेशनचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत करताना फौंडेशन व संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रभावती मास्तमर्डी म्हणाल्या की, बेळगाव दक्षिण मतदार संघात गोरगरीब व निम्न स्तरातील लोकांची संख्या अधिक आहे. त्यांना विशेषतः महिलांना आर्थिक अडीअडचणीच्या काळात बँकांकडून अर्थसाह्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या वेळेला तातडीने अर्थसाह्य पुरविण्याच्या हेतूने श्री प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेची तसेच समाजसेवेच्या उद्देशाने प्रभावती फोंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. १८ ते ५८ वयोगटातील गरीब महिलांना एक लाखाची विमासुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे हप्ते संस्था भरणार आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या संस्थांच्या उभारणीसाठी खूप मदत केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करून संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी आम्ही परिश्रम घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री एम. मल्लिकार्जुन नागपन्नवर म्हणाले की, प्रभावती मास्तमर्डी यांनी गोरगरिबांना अडीअडचणीला अर्थसाह्य करण्याच्या एका चांगल्या हेतूने या संस्थेची स्थापना केली आहे. चांगल्या हेतूने केलेल्या कार्यात यश नक्की मिळते. विश्वासाने व्यवहार केल्यास आर्थिक संस्था भरभराटीला येतात. त्यामुळे विश्वासाने, सचोटीने व्यवहार करून भागधारकांना उत्तरदायी राहून कामकाज करा, रिझर्व्ह बँकेसह नियामक संस्था, सरकारचे नियम काटेकोर पाळून संस्था चालवा. दरमहा संचालक मंडळाची बैठक घेऊन संस्थेच्या कामाचा आढावा घ्या. यातून तुमची संस्था नक्की प्रगती करेल असे सांगून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना आज होत आहे ही आनंदाची बाब आहे. बेळगाव जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यात अग्रणी आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांनी आपल्या प्रगतीतून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. प्रभावती मास्तमर्डी यांनी समाजहिताच्या हेतूने सुरु केलेल्या या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो, तिच्या अनेक शाखा निर्माण होवोत आणि चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासह या संस्थेने नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा मंत्री जारकीहोळी यांनी दिल्या.

जुनी हुबळी नीलकंठ मठाचे श्री शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, समाजसेवेच्या उदात्त हेतूने प्रभावती मास्तमर्डी यांनी या संस्था सुरु केल्या आहेत. त्यांना त्यात यश मिळो, कुठलेही काम करताना सावकाश पावले टाकत वाटचाल करावी लागते. प्रयत्नपूर्वक जबाबदारीने कार्य केल्यास यश मिळते. हे लक्षात घेऊन जबाबदारीने आर्थिक व्यवस्थापन करून संस्था नावारूपाला आणा आणि तुमचा समाजसेवेचा हेतू सफल करा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कुडलसंगम पीठाचे श्री बसवजय मृत्यूंजय महास्वामीजी आशीर्वचन देताना म्हणाले की, या संस्थेच्या नावातील सौहार्द हा शब्द खूप महत्वाचा आहे. पती-पत्नीत सौहार्द असेल तर त्यांचे कुटुंब प्रगती करते. सरकार आणि प्रजेत सौहार्द असेल तर राज्याची प्रगती होते. तसेच संचालक, भागधारक, कर्मचारी यांच्यात सौहार्द असेल तर आर्थिक संस्थांची भरभराट होते. हे लक्षात घेऊन संचालकांनी वाटचाल करावी. सहकार क्षेत्रात महाराष्ट्रानंतर आज कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. त्यातही उत्तर कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकात बेळगाव जिल्हा सहकार क्षेत्रात अग्रस्थानी आहे. जिल्ह्याचा हा लौकिक प्रभावती सौहार्द संस्थेने वाढवावा. प्रभावती मास्तमर्डी महत्वाकांक्षी आहेत. त्यांनी विणकरांची समस्या सोडविण्यासह अनेक सामाजिक कामे केली आहेत. राजकारणात त्यांना थोडे अपयश आले असले तरी भावी काळात त्या राजकारणातही आपला ठसा निश्चितपणे उमटवतील. या संस्थेच्या येत्या वर्षभरात किमान ५ शाखा सुरु व्हायला हव्यात अशा शुभेच्छा देऊन त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी संचालकांना केले.

दरम्यान, या समारंभात प्रभावती मास्तमर्डी यांचा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या स्थापनेसाठी सहकार्य केलेल्या व्यक्तींचा प्रभावती मास्तमर्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  समारंभात संस्थेच्या सरव्यवस्थापक श्रेया मास्तमर्डी, शाखा व्यवस्थापक अनिलकुमार बेळकुड, संचालक बसवराज मास्तमर्डी, मंजुनाथ दुदमी, मीनाक्षी झंवर, स्वाती पाटील, दीपा पट्टणशेट्टी, मेघ दुदमी, राजू भोवी, अल्लाबक्ष इनामदार, सलीम सनदी, शंकर पडेसूर, उज्ज्वला कित्तूर, मंजुनाथ कारी, नागरत्न कारी, राजकुमार मास्तमर्डी यांच्यासह अनेक मान्यवर, निमंत्रित, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: