विधानसभेत आज बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगावच्या विविध समस्यांवर चांगलाच आवाज उठवला. मात्र चर्चेदरम्यान त्यांच्यात आणि बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्यात तू तू – मै मै झाल्याचे पहायला मिळाले.
विधानसभेत आज सकाळच्या सत्रात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगावच्या विविध समस्यांवर चांगलाच आवाज उठवला. बेळगावचा विकास खऱ्या अर्थाने कुमारस्वामी-येडियुरप्पा यांच्या काळात सुरु झाला. त्यांच्या काळात सुवर्णसौधची उभारणी झाल्यापासून ते विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे पूर्वीच्या काँग्रेस सरकारला लक्ष्य केले. बेळगावचा विकास, व्यापार-उद्योग प्रामुख्याने गोव्यावर अवलंबून आहे.
परंतु, चोर्लामार्गे जाणारा बेळगाव-गोवा रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहतूक, प्रवाशांचा ओघ रोडावला आहे. त्यामुळे आमचा निम्मा व्यापार कोल्हापूरला स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. बेळगाव विमानतळाला जोडणाऱ्या ६ किमी रस्त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे. विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याची गरज आहे. त्यामुळे धावपट्टीची लांबी-रुंदी वाढवण्याची गरज आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने प्रस्ताव मंजूर केला आहे. राज्य सरकारने त्यासाठी जमीन संपादन करून देणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया लवकर पार पाडण्याची मागणी त्यांनी केली.
बेळगावात ग्राहक न्यायालय, कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरण मंजूर झाले आहे. पण त्यांना स्वतःची इमारत नसल्याने कामकाजात अडचण येत आहे. त्यामुळे दोन्ही न्यायालयाना तातडीने इमारत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत आणखी वीज वितरण केंद्रे स्थापन करावीत, लष्कराच्या ताब्यात असलेली राज्य सरकारची ७०० एकर जमीन ताब्यात घेऊन तेथे आयटी पार्क उभारण्याची मागणी केली.
सुवर्णसौध सुरु झाल्यामुळे या भागाचा विकास होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. अधिवेशनात येथील समस्या चर्चेला येतात. पण त्यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे सुवर्णसौध म्हणजे आमदारांसाठी टुरिंग टॉकीज बनल्याचा आरोप आ. अभय पाटील यांनी केला. तसे होऊ नये यासाठी बंगळुरात विधानसौधमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय संमेलने, परिषदा बेळगाव सुवर्णसौधमध्ये घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
आ. अभय पाटील यांनी याशिवाय विणकरांचे प्रश्न, येळ्ळूर येथील राजहंस गडावरील रोप वे आदी प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
या चर्चेदरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी, बेळगाव विमानतळावर दिवसरात्र विमान उतरण्याची सोय आहे. येथून विमान उड्डाणे मोठ्या प्रमाणात होत होती. प्रवाशांचा त्याला प्रतिसादही लाभत होता. तरीही ती हुबळी विमानतळावर का नेण्यात आली? असा सवाल केला. फ्लो
या विषयावरील चर्चेत अचानक आ. अभय पाटील आणि आ. राजू सेठ यांच्यात तू तू-मै मै झाली. काँग्रेसने ५० वर्षात बेळगावचा विकास केला नाही. संभाजी पाटील महापौर असताना बेळगाव महानगर पालिकेने तत्कालीन काँग्रेस सरकारकडे ५० लाखांचे कर्ज विकासासाठी मागितले, ते सुद्धा काँग्रेसने दिले नाही असा आरोप त्यांनी केला. बेळगावच्या विकासासाठी पूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी एक नया पैसादेखील दिला नसल्याचा टोला त्यांनी लगावला. अखेर सभापती यु. टी. खादर यांनी हस्तक्षेप करत हा वाद थांबविला.


Recent Comments