Belagavi

यत्नाळ यांनी काढले उत्तर कर्नाटकाच्या लोकप्रतिनिधींचे वाभाडे

Share

उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांतील मंत्री-आमदारांच्या उदासीनतेमुळे उत्तर कर्नाटक विकासात मागे पडल्याचा आरोप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आज विधानसभेत केला.

उत्तर कर्नाटकाच्या समस्या आणि विकासावर आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत चर्चा झाली. या विषयावर आ. जी. टी. पाटील सभागृहात बोलल्यानंतर आमदार राजू कागे आणि आमदार विजयानंद काशप्पनावर यांनी आपणाला बोलण्याची परवानगी देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी नकार देत विजयपूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना बोलण्याची सूचना केली.

त्यावर विजयानंद काशप्पनावर यांनी, आज दुपारी मुख्यमंत्र्यानी आमदारांची बैठक बोलावल्याने आम्हाला आता बोलू द्या अशी विनंती केली. मात्र अध्यक्षांनी ती नाकारली व विजयपूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना बोलण्याची सूचना केली. त्यावेळी सभागृहात काही काळ गोंधळसदृश्य वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटक अविकसित राहण्यात आदिलशाही-निजामशाहीपासून आजवरचे स्थानिक मंत्री-आमदार जबाबदार असल्याचे सांगून स्थानिक लोकप्रतिनिधींचे वाभाडे काढले. कर्नाटक राज्य मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, हैदराबाद प्रांत यामध्ये विभागला होता. १९७३ मध्ये देवराज अर्स यांनी म्हैसूर राज्याचे नाव ‘कर्नाटक’ असे ठेवले.

म्हैसूर प्रांताचा विकास होण्यामागे म्हैसूरच्या राजांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. शिक्षण, सिंचन, विद्युतीकरण याला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे आधीपासून या प्रदेशाचा विकास होत राहिला. मात्र दुर्दैवाने आदिलशाही-निजामशाहीत केवळ ही याची राणी, ती त्याची राणी असे होत राहिले. आजही विजयपूर, बागलकोट, गुलबर्गा येथे ऐतिहासिक स्थळांवर स्थानिक गाईड्स पर्यटकांना हीच माहिती देत असतात, असे ते म्हणाले.

उत्तर कर्नाटकचे मंत्री व आमदार सुरुवातीपासूनच या भागाचा विकास करण्यात उदासीन राहिले. बसवराज बोम्मई, एम. बी. पाटील. एच. के. पाटील हे मंत्री झाले, त्यांनी उत्तर कर्नाटक, जिल्ह्यांच्या विकासात थोडेफार योगदान दिले. फक्त एस. एम. कृष्णा यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी मेहनत घेतली. आमदार रमेश जारकीहोळी उत्तर कर्नाटच्या विकासासाठी आग्रही होते. मात्र दुर्दैवाने हलक्या राजकारणाने त्यांचा घात केला, असे यत्नाळ म्हणाले. त्यावर ‘हलका’ हा शब्द मागे घ्या, असे सभापतींनी सांगितले. यावर यत्नाळ यांनी तुम्हीच तो शब्द मागे घ्या असे सांगितले.

पुढे बोलताना यत्नाळ म्हणाले की, उत्तर कर्नाटकाचा महाराष्ट्रासारखा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्रात मुंबईचा विकास झाला तर पुण्याचा त्याहून अधिक विकास होत आहे. नागपूरला दुसऱ्या राजधानीचा दर्जा आहे. तेथे वर्षातून दोन विधिमंडळ अधिवेशने आई वर्षभर काही ना काही उपक्रम होतात. प्रत्येक जिल्ह्यात एमआयडीसी सुरु करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आमची उत्तर कर्नाटकातील बेरोजगार मुले बेंगळूरला नोकरीसाठी जातात, १२, १५ हजार पगारावर काम करतात. रूमचे भाडे, चहा-नाश्ता, जेवण, सुटीदिवशी एखादा सिनेमा पाहणे यातच त्यांचा पूर्ण पगार संपतो आणि आईवडिलांना घरून पैसे पाठवण्याची वेळ येते. हे चित्र बदलले पाहिजे, अशी मागणी यत्नाळ यांनी केली.

Tags: