विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सरकार उत्तर द्यायला तयार आहे. कोणत्याही गोष्टीला उशीर किंवा विलंब होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
बेळगावात सांबरा विमानतळावर सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आमचे सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार आहे. त्यात उशीर होऊ शकत नाही. आजही दुष्काळावर चर्चा सुरु आहे. आज चर्चेअंती आपण त्यावर उत्तर देऊ. याआधीच काय प्रस्ताव मांडला आहे, याचे उत्तर देऊ, उद्यापासून उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा होणार. त्या चर्चेलाही आपण योग्य उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
भाजप नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कामकाजाचा वेळ वाया जात असल्याची टिप्पणी करत भाजपमध्ये कधीच समन्वय नाही. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून ते सत्तेवर आले, थेट जनतेतून निवडून आले नाहीत. आता लोकांनी त्यांना नाकारले. त्यामुळे त्यांच्यात समन्वय होऊ शकत नाही. त्यांच्यात दोन-तीन गट असल्याचे सिद्दरामय्या यांनी सांगितले.
बेळगावमधील महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. पंचमसाली नेत्यांशी आणि स्वामीजींशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंचमसाली नेत्यांच्या चर्चेच्या विनंतीला आपण प्रतिसाद दिला आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे, संपूर्ण कर्नाटकाच्या विषयांवर चर्चा सुरु आहे. आम्ही सगळेच व्यस्त आहोत. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्याशी बेंगळूर येथे चर्चा केली जाईल, असे मी म्हटले होत, असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.
राज्यातील काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल या माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि जेडीएस यांची सत्तेविना तडफड सुरु आहे. पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे ते तडफडत आहेत, सरकार कोसळण्याच्या भ्रमात आहेत, अशी टीका सिद्दरामय्यांनी केली.


Recent Comments