शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय किसान संघाच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे आज सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले.
समर्पक पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय किसान संघाच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे आज अध्यक्ष विवेक मोरे व सरचिटणीस माधव हेगडे यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाबाबत बोलताना शेतकरी नेते अध्यक्ष विवेक मोरे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरातील अतिवृष्टी आणि यंदाच्या दुष्काळामुळे शेतकरीवर्ग हादरला आहे. यंदा मान्सून पूर्णपणे अपयशी ठरला असून अन्नधान्य उत्पादन घटणार आहे, हे विसरल्यास आगामी काळात अन्नाचा दुष्काळ पडेल.पुढील ८-९ महिने पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुरेढोरे सांभाळणे कठीण झाले आहे.
किमान कूपनलिकेमधून पाणी काढून बागायती पिके घ्यायची म्हटल्यास समर्पक वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकरी तोट्यात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, असे सांगून भारतीय किसान संघ या सर्व समस्या सोडविण्याची मागणी करत आहे.
यावेळी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments