Belagavi

आम्हाला बेळगाव पालिकेत ‘ऑपरेशन हस्त’ची गरज नाही : सतीश जारकीहोळी

Share

आम्हाला बेळगाव महानगरपालिकेत ऑपरेशन हस्त राबवायची गरज नाही, भाजपला कारभार चालवू द्या, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

मंत्री जारकीहोळी यांनी आज, सोमवारी बेळगावातील काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसोबत सतत मेहनत सुरू आहे. उमेदवार निश्चित झालेले नाहीत. अधिवेशनादरम्यान पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांशी सतत संपर्क असायला हवा. समाज, पक्ष, जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार यांची सहमती असेल तर पक्षाचा उमेदवार विजयी होईल, हायकमांड, प्रदेश काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची निवड करेल, असे उत्तर त्यांनी याबाबतच्या प्रश्नावर दिले.

बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात लोकप्रिय असलेल्या लिंगायत आणि धनगर समाजातील उमेदवार निवडण्याची प्रक्रिया राबवण्याचा विचार करत आहोत. राज्यात भाजप विरोधी पक्षात आहे. त्यांच्याकडून आमच्यावर आरोप होणे स्वाभाविक आहे. आमच्या हमी योजना लोकांपर्यंत जात आहेत. ते विनाकारण आरोप करत आहेत, असे ते म्हणाले.

आपली मुले प्रियंका आणि राहुल यांना निवडणुकीत उतरवण्याबाबतच्या प्रश्नावर मंत्री जारकीहोळी म्हणाले की, त्यांना निवडणूक लढवण्यात रस नाही. पुढे काही दिवसांत निर्णय होईल. सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हायकमांडवर अवलंबुन आहे, 2028 च्या निवडणुकीत आपण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असावे का याचा निर्णयही हायकमांडच घेतील, सध्या तसा कोणताही विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

केपीसीसीच्या अध्यक्षपदी डीके शिवकुमार कायम राहतील. अध्यक्ष बदलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातील ३८ राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.बेळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवक संपर्कात आहेत, मात्र आम्हाला महापालिकेत ऑपरेशन हस्त राबवण्याची गरज नाही, त्यांना जनतेकडून अधिकार देण्यात आले आहेत, त्यांनी ते स्वत: चालवले पाहिजेत. पण भाजप नगरसेवकांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.

बेळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारी प्रकरणात अडकत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यासाठी 410 कोटी भरपाई निधी केंद्र सरकारकडून मिळायला हवा. तो येताच जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाईल, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर सांगितले. बेळगाव काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, किरण साधूनावर आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Tags: