Belagavi

बैलहोंगलमध्ये जनता दर्शन कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद

Share

बैलहोंगल येथील शिव बसव कल्याण मंडपात आज जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव व तालुका प्रशासन, बैलहोंगल यांच्या संयुक्त विद्यमाने जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

बैलहोंगल तालुक्यातील जनतेच्या विविध तक्रारींचे जागीच निवारण करण्याच्या हेतूने आज जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन शहरातील शिव बसव कल्याण मंडपात करण्यात आले होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, फलोद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड,
मल्लिकार्जुन कलादगी आदी अधिकाऱ्यांनी जनतेचे अर्ज स्वीकाले.

जनता दर्शनात बोलताना आमदार महांतेश कौजलगी म्हणाले की, जात प्रमाणपत्र, खाते बदल, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, विजेचे खांब बसवणे अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही लोक सतत सरकारी कार्यालयात चकरा मारत असतात. त्यामुळे अशा अर्जांचा आढावा घेऊन त्यांच्या समस्या त्वरीत सोडवाव्यात, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, बैलहोंगल तालुक्यातील काही गावे कित्तूर तालुका केंद्राला जोडण्यात आली आहेत. या दोन तालुक्यांतील लोकांनी आपले अर्ज अधिकाऱ्यांना देऊन समस्यांची सोडवणूक करून घेता येईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जनतेला जनता दर्शनाची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे.


“जनता दर्शन’ कार्यक्रम हा राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्ह्यासह तालुका केंद्रावर दर 15 दिवसांनी “जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात जनतेने दाखल केलेल्या तक्रारींचे शक्य तितके जागेवरच निवारण करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. तांत्रिक कारणास्तव हे शक्य न झाल्यास, लोकांच्या तक्रारी जागेवरच नोंदवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जातात. सर्व काही ठराविक मुदतीत सोडवले जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, जनता दर्शन कार्यक्रमाला बैलहोंगल तालुक्यातील विविध गावच्या लोकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.

Tags: