आमदार अभय पाटील हे “पाटील” आहेत हे खरेच आहे, महानगरपालिका, बुडा आणि स्मार्टसिटीचा अनुभव आहे, तसाच अधिका-यांना ब्लॅकमेल करण्याचा अनुभव अधिक आहे. जनतेसाठी काम करणाऱ्यांना असा अनुभव नाही, अशी टीका बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी केली.
बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार राजू सेठ म्हणाले की, आमदार अभय पाटील हे “पाटील” आहेत हे खरेच आहे, महानगरपालिका, बुडा आणि स्मार्टसिटीचा अनुभव आहे, तसाच अधिका-यांना ब्लॅकमेल करण्याचा अनुभव अधिक आहे. मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही किंवा अधिकाऱ्यांना धमकावणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही, पालिकेतील बेकायदेशीर कामांची चौकशी करू. आमच्या नेत्यांनी यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
महापालिका बरखास्तीच्या मुद्द्यावर बोलताना आ. राजू सेठ म्हणाले की, मी आमदार या नात्याने, त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे की, महापालिका कोणत्याही कारणास्तव बरखास्त होणार नाही. पालिकेकडून सरकारला उत्तर गेले आहे. आयुक्त आणि महापौरांनीही सही केली आहे. मी अनेकदा महापौरांकडे विचारणा केली आहे.
मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही, ते फक्त आमच्यावर आरोप करत आहेत, आम्ही आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी गहाळ फाइलची चौकशी करू, आमच्याकडे हरवलेल्या फाइलची झेरॉक्स प्रत आहे. त्यांचे सरकार सत्तेवर असताना निवडून आलेल्या 58 नगरसेवकांना दीड वर्षासाठी कोणत्या कारणासाठी सभागृहाबाहेर ठेवण्यात आले, याबाबत त्यांनी स्वत: अनेकदा तक्रार केली होती, हीच राज्यघटना आहे का?, हीच त्यांची संस्कृती आहे का? असा सवाल करत अभय पाटील यांनी खालच्या पातळीवरचे राजकारण करत असल्याचे सांगितले.
कंत्राटदाराने स्वच्छता कामगारांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले आहे या प्रश्नाला उत्तर देताना आ. सेठ म्हणाले की, आमच्या कार्यकाळात आम्ही लोकांसाठी काम करत आलो आहोत, आमच्या सरकारने राज्यातील जनतेला 5 मोठे कार्यक्रम दिले आहेत, त्याचप्रमाणे यापूर्वी 138 स्वच्छता कामगारांनी सदाशिवनगर येथील गॅरेजमध्ये ठिय्या आंदोलन केले.
त्यावेळी मी त्यांची भेट घेऊन समजूत घातली होती. त्यांना वर्षानुवर्षे पगारच दिला जात नाही, त्यामुळे त्यांच्या पगारात कुठे पाणी मुरतेय? त्यांची नियुक्ती कोणी केली, याचीही चौकशी व्हावी. आपले बेळगाव शहर सुंदर करण्यासाठी कष्ट करणाऱ्या स्वच्छता कामगारांना त्यांचा पगार मिळावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बसवराज शेगावी, राजा सलीम काशीमनवर आदी उपस्थित होते.


Recent Comments