बेळगाव महापालिकेतील 138 पौरकार्मिकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप जिल्हा पालकमंत्र्यांनी केला असला तरी त्या नियुक्त्या मनपा आयुक्तांच्या आदेशावरूनच झाल्या असून सरकारनेही त्यांना वेतन देण्याचा आदेश बजावला आहे अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली.
बेळगावच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्यात बेळगाव महानगरपालिका आणि इतर मुद्द्यांवरून आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. महापालिकेत बाह्यकंत्राटी तत्वावर नेमलेले 138 पौरकार्मिक, महापौरांच्या सहीची फाईल गहाळ होणे हे मुद्दे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत.
त्यासंदर्भात बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या आरोपांचा समाचार घेतला.
आमदार पाटील म्हणाले की, पौरकार्मीक नियुक्तीत महापौर, स्थायी समितीचा काही संबंध नाही. पालिकेच्या सामान्य सभेच्या विषयपत्रिकेत आयुक्तांच्या सूचनेवरून पौरकार्मीक नियुक्तीचा विषय नमूद केला होता. स्थायी समितीने याबाबत केलेल्या ठरवलं पालिका सभागृहात अनुमोदन देण्यात आले.
त्यातही आयुक्तांच्या सूचनेवरून असे नमूद केले आहे. स्थायी समिती किंवा सभागृहाने आयुक्तांच्या सूचनेवरून या विषयावर चर्चा करून ठराव मंजूर केले असला तरी अंतिमतः निर्णय केवळ आयुक्तच घेऊ शक्तात. त्या 138 पौरकार्मिकांमध्ये चालक, लोडर आदींचाही समावेश आहे.
नगरविकास खात्यानेही ठरावाला मंजुरी देऊन त्यांना वेतन देण्याचा आदेश बजावला आहे. जर ठराव किंवा नियुक्ती बेकायदेशीर असती तर सरकारने त्याला कशी मान्यता दिली असती? त्यामुळे सत्ताधारी गटाने पैसे घेऊन नियुक्ती केली हा आरोप हास्यास्पद आहे. पण लोकांमध्ये यावरून चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी आपण हे स्पष्टीकरण देत आहे असे त्यांनी सांगितले.
महापौर, नगरसेवकांसह राज्यपालांना भेटल्यासंदर्भात बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, राज्य सरकार जर अधिकाराचा दुरुपयोग करत असेल तर राज्यपालांना त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांकडून मनपाच्या कारभारात ढवळाढवळ होत असल्याने तसेच आयुक्तांकडून नियमबाह्य कृती होत असल्याने हा विषय आम्ही राज्यपालांच्या कानावर घातला आहे.
बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था इतकी बिघडली आहे की, नगरसेवक राजू भातकांडे यांना दोनशे जणांच्या जमावाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मनपातील फाईल गहाळ प्रकरणी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रार देण्यास गेलेल्या महिला अधिकाऱ्यांना मार्केट पोलीस ठाण्यात रात्री एक वाजेपर्यंत थांबवून घेण्यात येते हा कुठला प्रकार आहे? कोणाच्या दबावाखाली पोलीस असे करत आहेत? असे सवाल करून आमदार अभय पाटील यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी भाजप राज्य प्रवक्ते एम बी. जिरली यांनीही काँग्रेस सरकारच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला. सरकारची हमी एटीएममध्ये बदलली असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी महानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, पालिकेतील सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, नगरसेवक गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाळी आदी उपस्थित होते.


Recent Comments