राज्याच्या स्वाभिमानाचे, संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भुवनेश्वरी देवीच्या नावाने बेळगावात सतत 42 वर्षे भुवनेश्वरी उत्सवाचे आयोजन केले जातेय ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रशंसोद्गार अभिनेत्री मालती सरदेशपांडे यांनी काढले.
बेळगावात नवरात्रानिमित्त भुवनेश्वरी देवी उत्सव समितीच्या वतीने कुमार गंधर्व कला रंगमंदिरात आयोजित पाच दिवसीय भुवनेश्वरी उत्सवाचे शानदार उदघाटन आज बुधवारी दुपारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अभिनेत्री मालती सरदेशपांडे व अन्य महिलांनी दीप प्रज्वलनाने उत्सवाचे उदघाटन केले.
अभिनेत्री मालती सरदेशपांडे पुढे म्हणाल्या की, अन्य राज्यांच्या तुलनेत कर्नाटक एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे. येथील संस्कृती, कला, परंपरा, लोकजीवन समृद्ध आहे. भुवनेश्वरी देवी ही विजयनगर साम्राज्याचीही आराध्य देवता. हंपी येथे अजूनही या देवीचे मूलस्थान आहे. विजयनगर साम्राज्याचे पतन झाल्यानंतर म्हैसूरच्या सम्राटांनी देवीला म्हैसूरला नेऊन प्रतिष्ठापना केली आणि दसरा उत्सवाची नाडहब्बा म्हणून सुरुवात केली. या देवीच्या नावाने तुम्ही बेळगावात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 42 वर्षे भुवनेश्वरी उत्सवाचे आयोजन करत आहेत हि कौतुकास्पद बाब आहे असे त्यांनी सांगितले.
भुवनेश्वरी उत्सवाच्या संस्थापिका रंजना नायक यांनी भुवनेश्वरी उत्सवाच्या स्थापनेची आई वाटचालीची माहिती दिली. बेळगावात कन्नड व मराठी भाषा एकत्र नांदतात. मराठी महिलांचा शारदोत्सव पाहिल्यानंतर 1981मध्ये नवरात्रापूर्वी भुवनेश्वरी उत्सवाच्या आयोजनाची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला खूप कमी प्रतिसाद मिळाला. पण नंतर उत्साहवर्धक प्रतिसाद मिळू लागला. प्रख्यात विदुषी सरोजनी महिषी यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी आमच्या भुवनेश्वरी उत्सवाला हजेरी लावली आहे असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी भुवनेश्वरी उत्सव समितीच्या सदस्यांनी कन्नड नाडगीत आणि शारदास्तवन सादर केले. याप्रसंगी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Recent Comments