Belagavi

कोवळ्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Share

शेजारच्या घरी कार धुण्यासाठी गेलेल्या कोवळ्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर दहावा क्रॉस येथे आज घडली. संबंधित कारमालकाने मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले नसल्यामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

बेळगावातील भाग्यनगर दहावा क्रॉस येथे उत्तर प्रदेशचे एक कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या रजत गौरव नामक चौदा वर्षांच्या मुलाचा आज विजेचा धक्के लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या शेजारच्या चौगुले नामक व्यक्तीच्या बंगल्याच्या आवारात आज, शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास घडली. रजत आठवीच्या वर्गात शिकत होता. सध्या सुटी असल्याने तो कुटुंबाला हातभार लावण्यासाठी सकाळच्या वेळी पेपर टाकण्याचे काम करत होता. नेहमीप्रमाणे तो चौगुले यांच्या घरी पेपर टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी चौगुले यांनी, आज अमावस्या असल्याने आपल्या गाड्या धुशील का?, त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने त्याने होकार दिला. बंगल्याच्या आवारात गेल्यावर कारशेजारी पडलेल्या वीजभारीत वायरचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तो अत्यवस्थ झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, चौगुले कुटुंबियांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप रजतच्या कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी केला आहे. याबाबत इन न्यूजशी बोलताना रजतचे काका लालचंद गौतम यांनी सांगितले की, रजत सकाळच्या वेळी भाग्यनगरमध्ये पेपर टाकत होता. चौगुले यांच्या घरी तो पेपर टाकण्यास गेला असता, त्यांनी त्याला कार धुवायला सांगून पैसे देण्याचे सांगितले. त्यानुसार तो कार धुण्यास गेला असता, त्याला विजेचा धक्का बसून तो अत्यवस्थ झाला. त्याला तातडीने दवाखान्यात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता. घटना घडल्यानंतर चौगुले कुटुंबीयांनी दवाखान्यातही नेले नाही अन दोन तासांनी आम्हाला कळवले असा आरोप त्यांनी केला.

रजतच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाला त्यांनी कार धुवायला सांगितले आणि त्याला विजेचा धक्का बसल्यानंतर दवाखान्यातही नेले नाही. तब्बल दोन तासांनी आम्हाला कळवले, मी रडत जाऊन पाहिले तर रजत कारशेजारी मृतावस्थेत पडलेला दिसला. रजतला एखादा रोग झाला असावा अशा पद्धतीने बंगल्याच्या आवारात टाकले, कोणी त्याला उचलून बसवलेही नाही. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक धावत आले. सगळ्यांनी मिळून दवाखान्यात नेले. पण तोवर रजत आम्हाला सोडून गेला असा आक्रोश त्या माऊलीने केला.

रजतच्या घरचे शेजारी इम्तियाज मुल्ला यांनी सांगितले की, सकाळी 7.30च्या सुमारास घटना घडल्यावर चौगुले कुटुंबीयांनी 9.30 च्या सुमारास त्याच्या घरच्यांना कळवले. त्यानंतर आम्ही त्याला इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी जरा आधी आणले असते तर रजतला वाचवता आले असते, आता त्याचा मृत्यू झाला आहे असे सांगितले. चौगुले कुटुंबीयांनी हलगर्जीपणा केल्यानेच रजतचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. रजतला विजेचा धक्का बसल्यानंतर दवाखान्यात न नेता चौगुले कुटुंब पोलिसांकडे गेले आणि आपण कसे सुरक्षित राहू याची काळजी घेतली. त्याऐवजी त्यांनी रजतला रुग्णवाहिकेतून तातडीने इस्पितळात नेले असते तर तो वाचला असता असे सांगून या कुटुंबाला योग्य न्याय आणि भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. बाईट
दरम्यान, घटनास्थळी व टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी बेळगाव टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: