Belagavi

शाहू नगरात कचऱ्याचे साम्राज्य : सांडपाणी आणि कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी

Share

स्मार्ट सिटी म्हणून पुरस्कार मिळालेल्या बेळगावमध्ये अस्वच्छता भरून राहिली आहे . खुद्द उपमहापौरांचं वार्ड असलेला वार्ड क्रमांक ३३ मधील वंदना कॉलनीतील ही दृश्य पाहून याची खात्री पटते . जर उपमहापौरांच्याच वार्डात एवढी अस्वच्छता आहे तर मग इतर ठिकाणी काय अवस्था असेल असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत .

बेळगावला दुसरी राजधानी म्हणून देखील ओळखले जाते . आता तर बेळगावला स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आहे .. पण ही खरोखर स्मार्ट सिटी आहे का ? असा प्रश्न पडतो . याचे कारण म्हणजे बेळगावात ठिकठिकाणी आढळून येणारे कचऱ्याचे ढीग .. आता हेच दृश्य पहा ना .. शाहूनगर येथील वंदना कॉलनीत कित्येक दिवस कचऱ्याची उचलच झाली नाही . सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे .

ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकचा कचरा साचला आहे .
महापालिकेने शाहू नगर व वंदना कॉलनीची तात्काळ स्वच्छता करावी व वरिष्ठांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कामगारांना ताकीद द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक लोकांनी घरातील कचरा महामंडळाच्या कचरावाहू वाहनाकडे द्यावा अशी सूचना करण्यात येते . मात्र कचऱ्याची उचल करण्याची पालिकेची गाडी देखील अनियमित आहे . अशाचप्रकारे या वार्डातील कंग्राळी खुर्द भागातील ज्योतीनगराच्या मुख्य रस्त्यावर देखील कचऱ्याचे साम्राज्य आहे . इथले लोक कचरा गाडी नियमित येत नसल्याने आपल्या घरात साठणारा कचरा मुख्य रस्त्याच्या कडेला आणून टाकत आहेत . त्यामुळे दुर्गंधी पसरून , लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

संबंधित लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेने याची दखल घेऊन , कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरा गाडी नियमित पाठवावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत

Tags: