उसाला प्रतिटन 3800 रुपये दर द्यावा, गेल्यावर्षीचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता दसऱ्यापूर्वी जमा करावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावात आज शेतकऱ्यांनी चाबूकमोर्चा काढून एल्गार पुकारला. मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु करू देणार नाही असा इशारा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
होय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तसेच कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने यांच्या सहयोगाने बेळगावात आज शेतकऱ्यांनी चाबूकमोर्चा काढून चन्नम्मा चौकात ठिय्या आंदोलन केले. किल्ला तलावाजवळील अशोक सर्कलमधून चाबूकमोर्चाला प्रारंभ झाला. हिरव्या टोप्या, शाली घालून, हातात चाबूक आणि ऊस घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी झाले होते.
हातातील चाबकाने रस्त्यावर फटकारे मारत, मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी करत चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा कडून चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडून निदर्शने करण्यात आली. यावेळी काही काळ रस्ता रोखून धरल्याने चौकात वाहनांची कोंडी झाली. फ्लो
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या गळीत हंगामाची ऊसबिले बहुतेक साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दिली आहेत. पण कारखान्यांनी चढ्या भावाने साखरविक्री करून आणि डिस्टिलरी असलेल्या कारखान्यांनी उपपदार्थांच्या विक्रीतून मोठा नफा कमवला आहे. त्यामुळे रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार एफआरपी दिला तरी, अतिरिक्त पैसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे लागतात. त्याशिवाय गेल्यावर्षीचा 400रुपयेचा दुसरा हप्ता दसऱ्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अन्यथा आम्ही कारखाने सुरु करू देणार नाही. सरकारनेसुद्धा कारखान्यांना याबाबत सूचना द्यावी अन्यथा सरकारलाही याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
आणखी एका शेतकरी नेत्याने सांगितले की, ऊस उत्पादकांच्या जीवावर चालणारे साखर कारखाने नफ्यात असूनही कारखानदार शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाहीत, थकीत हप्ते देण्यास विलंबाचे धोरण राबवितात. त्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आहेत. कारखान्यांनी गेल्यावर्षीचा दुसरा हप्ता दसर्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
गणेश नामक शेतकरी नेत्याने सांगितले की, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सकाळी 11 वाजता बैठकीला बोलावले, मात्र कारखानदारांना दुपारी 4 वाजता बोलावले. समोरासमोर बसून चर्चा करायची असताना दोघांना वेगवेगळ्या वेळा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. ऊस उत्पादकांना लावणी, तोड, वाहतूक आदी बाबींवर प्रतिटन येणार खर्च वाढला असूनही कमी एफआरपी दिला जातोय. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यांच्या समस्या सरकारने न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.

दरम्यान, चन्नम्मा चौकात निदर्शक शेतकऱ्यांनी भर रस्त्यात ठाण मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. निदर्शनानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बेळगावसह विविध ठिकाणच्या ऊसउत्पादक, शेतकरी, ऊस वाहतूकदार आदींनी भाग घेतला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments