नियमाप्रमाणे डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठीही ३ टप्प्यातील सीईटी परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी पीयूसी सायन्स विद्यार्थ्यांची पीजीसीईटी घेणाऱ्या कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने डिप्लोमा विद्यार्थ्यांवर अन्याय चालविल्याचा आरोप करून अभाविपतर्फे टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे आज निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
डिप्लोमा विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब करण्यात आला. आता त्यांच्यासाठी घाई-गडबडीत केवळ दोन टप्प्यातील कौन्सिलिंग घेण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब प्रतिभावंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असा आरोप अभाविपने केला आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे ३ टप्प्यात डिप्लोमा विद्यार्थ्यांचे सीईटी कौन्सिलिंग घेण्यात यावे या मागणीसाठी अभाविपच्या नेतृत्वाखाली अनेक विध्यार्थ्यानी टिळकवाडीतील आरपीडी क्रॉसवर निदर्शने केली. यावेळी राज्य सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभाविपचे पदाधिकारी मल्लिकार्जुन म्हणाले की, सरकार आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण डिप्लोमा विध्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. पीजीसीईटी प्रमाणेच डिप्लोमा विध्यार्थ्यांसाठी नियमाप्रमाणे ३ टप्प्यात कौन्सिलिंग घेतले पाहिजे. मात्र डिप्लोमा परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब लावणे, घाईत २ टप्प्यात त्यांचे कौन्सिलिंग घेणे हा प्रकार पाहता सरकारमधील काहींनी अभियांत्रिकीच्या जागांचे प्रवेश विक्री करण्याचा घाट घातलाय की काय अशी शंका येते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. तो टाळण्यासाठी परीक्षा प्राधिकरणाने नियमानुसार कौन्सिलिंग व सीईटी प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली. ही मागणी मान्य न केल्यास, अभाविपतर्फे ‘चलो विधानसौध’ची हाक देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मल्लीकार्जून यांनी दिला.
यावेळी टिळकवाडी परिसरातील विविध महाविद्यालयाचे विध्यार्थी, अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments