Belagavi

धनगरांच्या एसटी प्रवर्गात समावेशासाठी केंद्रावर दबाव आणू : सिद्दरामय्या

Share

शतकानुशतके जंगल, डोंगरदऱ्यातून फिरून उपजीविका करणाऱ्या धनगर समाजाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट केले आहे. या समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिली.

बेळगावातील जिल्हा क्रीडांगणावर आज शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनल या धनगर समाजाच्या राष्ट्रीय संघटनेचे नववे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने या अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सिद्दरामय्या यांचा घोंगडे, शाल, स्मृतिचिन्ह देऊन राष्ट्रीय सत्कार करण्यात आला.

अधिवेशनाला संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्दरामय्या पुढे म्हणाले, विरोधक मी जातीयवादी असल्याचा आरोप करतात. मात्र उभ्या हयातीत मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही अन जिवंत असेपर्यंत करणारही नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर माझा विश्वास आहे. मी सहसा देवस्थानात जात नाही, पण गेलो तर ‘सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शक्ती दे’ अशी प्रार्थना देवाकडे करतो. शतकानुशतके संधींपासून वंचित राहिलेल्या, पायदळी तुडवलेल्या जातींनी आपल्या घटनादत्त, न्याय्य हक्कांसाठी असे मेळावे घेणे चुकीचे नाही. म्हणून मी अशा मेळाव्यांना जातो.

त्यामुळे धनगर समाजाने आपल्या हक्कांसाठी हे अधिवेशन घेतले त्यात काही चूक नाही. अनेक शतकांपूर्वी अनुभव मंडपाच्या माध्यमातून जातींची उतरंड मोडून काढून सर्वांना समान वागणूक, सन्मान देणाऱ्या बसवण्णा आणि शरणांचा आदर्श आम्ही पाळतो. त्यामुळेच कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी नव्हे तर सर्व जातीच्या लोकांसाठी आमच्या सरकारने कल्याणकारी हमी योजना आणल्या. त्याचा लाभ सर्व जाती-धर्माचे लोक घेत आहेत असे सिद्दरामय्या म्हणाले.

या अधिवेशनात देशभरातील विविध प्रांतातील विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या धनगर समाजबांधवांनी हजेरी लावली हे पाहून समाधान वाटले. शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ आणि उपाध्यक्ष एच. एम रेवण्णा यांनी धनगर समाजाला एकसंघ करण्यासाठी हे महत्वपूर्ण कार्य केल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यानी केली.

कागीनेले निरंजनानंद पुरी पीठाचे निरंजनानंद महास्वामीजींनी धनगर समाजाला साहचर्यपूर्ण सहजीवनाची परंपरा असल्याचे सांगून ती परंपरा समाजबांधवांनी सुरु ठेवण्याचे आवाहन केले. बाईट.
धनगर समाजाचे हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी, देशभरात विविध नावांनी ओळखला जाणारा धनगर समाज राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. या दृष्टीने शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ आणि उपाध्यक्ष एच. एम रेवण्णा अतोनात प्रयत्न करत आहेत.

धनगर समाजाचा टक्का राजकारणात वाढला पाहिजे असे सांगून केंद्र व राज्य सरकारांनी मेंढपाळ धनगर समाजाला औषधे व अन्य सुविधा पुरविण्याची गरज व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, गुजरातचे राज्यसभा सदस्य सागर रायका, राजस्थानचे कानूराम देवासी, आंध्र प्रदेशचे मल्लेश आदींनी विचार मांडले.

Tags: