Belagavi

बेळगावात नेगीलयोगी रयत संघटनेतर्फे निदर्शने

Share

बेळगाव आणि खानापूर तालुके दुष्काळपीडित जाहीर करावेत, पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी या मागणीसाठी बेळगावात आज शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला.
नेगीलयोगी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन छेडले. पावसाअभावी वाळून गेलेली पिके हातात घेऊन सरकारच्या विरोधात नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नेगीलयोगी रयत संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणाचा निषेध केला. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार सापत्नभावाचे धोरण राबवत आहे. सरकार आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही.

आम्ही या भागात बटाटे, ऊस आणि भात पिकवतो. या पिकांना पुरेसे पाणी द्यावे लागते तरच त्यांची पोसवणूक होते. पण पावसाशिवाय पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तशातच हेस्कॉम खंडित वीज पुरवठा करत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. काँग्रेस सरकार हमी योजनेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ते स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी पीक नुकसानीबाबतचा तपशीलवार अहवाल सरकारला पाठवून देऊन, पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी नेते राजू मरवे, रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags: