Belagavi

भुभाडे कंत्राटदाराच्या विरोधात संतप्त विक्रेत्यांचा पालिकेवर मोर्चा

Share

बेळगावातील भाजी-फळ विक्रेत्यांकडून अव्वाच्यासव्वा भुभाडे वसुली करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त विक्रेत्यांनी आज बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने केली.

गरिबीच्या हलाखीत जीवन जगणारे गोरगरीब भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांकडून मनपाचा दैनंदिन भूभाडे वसुली कंत्राटदार पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुभाड्याच्या नावाखाली दामदुप्पट पैसे उकळल्याचा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी केला आहे.

होय, बेळगावला राज्याची दुसरी राजधानी म्हटले जाते. शहराचा खूप विकास झाला असला तरी, इथे गरीब लोक एक वेळच्या जेवणासाठीही झगडत आहेत. भाजी-फळे विक्री करून इमानदारीने पोट भरणाऱ्या गोरगरिबांकडून दामदुप्पट पैसे उकळण्यात येत आहेत. महानगर पालिकेच्या हद्दीतील भूभाडे वसुली कंत्राटदार बेळगावच्या काकतीवेस, गणपत गल्ली, समादेवी गल्ली येथील रस्त्यावरील भाजीविक्रेते, फेरीवाले, हातगाडी व्यावसायिकांना शिवीगाळ करत, त्यांचे साहित्य उचकटून टाकत छळ चालवल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेवक शंकर पाटील म्हणाले की, भुभाडे वसुली करारानुसार भाजी विक्रेत्यांकडून 10 रुपये, तर ढकलगाडी विक्रेत्यांकडून 50 रुपये वसूल करायला हवेत, मात्र भूभाडे वसुली ठेकेदार त्यांच्याकडून 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये अशी मनमानी व बिनदिक्कतपणे वसुली करत आहेत. .गोरगरीब व्यापाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यांनी कंत्राटदाराला नोटीस देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले की, पूर्वीचा भू भाडे वसुली कंत्राटदार रास्त भाडे आकारत असे. पण आता नवीन ग्राउंड भाडे वसुली कंत्राटदार व त्याचे लोक दिवसातून ३-४ वेळा भाडे वसूल करत आहेत. विरोध केल्यास ते आम्हाला शिवीगाळ करतात, भाजीच्या टोपल्या, वजने उचलून नेतात. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.

यावेळी महानगरपालिकेच्या समोर भाजी व फळ विक्रेते व ढकलगाडी विक्रेत्यांनी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.

Tags: