संतांच्या संगतीत राहिल्याने अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल होते. त्यामुळे जीवनातील संकटे, दुःख आणि अडचणींवर मात करता येते असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाच्या जबलपूर येथील परम आदरणीय श्रीमती राज नागपाल यांनी केले.

बेळगावात रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे कन्व्हेन्शन हॉलमध्ये आज, रविवारी संत निरंकारी मंडळ, बेळगाव शाखेतर्फे कर्नाटक विभागस्तरीय ‘महिला संत समागम’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित महिला भक्तांना संबोधित करताना श्रीमती राज नागपाल पुढे म्हणाल्या की, प्रत्येकाच्या जीवनात अनेक दुःख, अडचणी असतात. विशेषतः महिलांना तर संपूर्ण कुटुंबाची स्वयंपाकापासून सर्व जबाबदारी घ्यावी लागते. त्यातून त्यांची चिडचिड होते.
यावर मार्ग काढण्यासाठी चित्त स्थिर, शांत हवे. अध्यात्माचा आसरा घेतल्याने अशा प्रसंगातून मार्ग काढणे शक्य होते. त्यासाठीच संतांचा संग आवश्यक आहे. संतांच्या संगतीमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे विकार आणि विचारांवर काबू ठेवून, भरकटणारे मन शांत व स्थिर ठेवता येते. त्याशिवाय आपले कर्मही चांगले असायला हवे. सद्गुरू बाबा निरंकारी यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करून सुखी जीवन जगता येते असे त्यांनी सांगितले.
यावेळी निरंकारी महिला भक्तांनी विविध भजन-कीर्तन सादर केले. संत निरंकारी मंडळाचे बेंगळूर झोनल इनचार्ज सुनील रात्राजी यांनी परम आदरणीय राज नागपाल यांचे स्वागत केले. बेळगाव संयोजक श्रीमती शशी आनंदजी यांनी त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
या महिला संत समागम कार्यक्रमाला बेळगाव तसेच राज्याच्या विविध भागातील सुमारे 1500 भाविक उपस्थित होते. प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Recent Comments