Belagavi

मिरजी महाविद्यालयात कन्नड उत्सवाचा जल्लोष

Share

पहावे तिकडे लालपिवळे ध्वज, कन्नडचा जयघोष, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात काढलेली भुवनेश्वरी देवीच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक असे जल्लोषी वातावरण बेळगावातील महावीर पी. मिरजी महाविद्यालयाच्या परिसरात आज पहायला मिळाले. निमित्त होते कन्नड उत्सवाचे.

बेळगावातील सन्मती शिक्षण संस्थेच्या महावीर पी. मिरजी वाणिज्य महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज कन्नड उत्सवाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या प्रांगणातून परिसरातील मुख्य रस्त्यावर भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाजप महानगर सरचिटणीस ऍड. मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला चालना देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी डोक्यावर जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. तर विध्यार्थी जल्लोषात मिरवणुकीसमोर नृत्य करत होते.

याप्रसंगी बोलताना ऍड. मुरुगेंद्रगौडा पाटील म्हणाले की, दरवर्षी मिरजी वाणिज्य महाविद्यालयात नोव्हेंबरमध्ये कन्नड उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा विध्यार्थ्यांच्या आग्रहास्तव जुलैमध्येच या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला गडाद यांनी सांगितले की, बीकॉम अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या आग्रहाखातर यंदा जुलैमध्येच कन्नड उत्सवाचे आयोजन केले आहे. विध्यार्थ्यानी त्यात उत्साहाने भाग घेतला आहे. यानिमित्त आंतरमहाविध्यालयीन गीतगायन स्पर्धा आयोजित केली आहे.

दरम्यान, कन्नड उत्सवात ग्रामीण महिला विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कनकगिरी, कन्नड आंदोलक अंकित मुदकन्नावर उपस्थित होते. राजेश्वरी हिरेमठ, पद्मा साबण्णावर आदींनी गीतगायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Tags: