Belagavi

मणिपूर संघर्ष : ख्रिश्चन समुदायाच्या वतीने बेळगावात मूक निषेध फेरी

Share

मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाच्या वतीने बेळगावात आज मूक निषेध फेरी काढण्यात आली.

युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्स आणि पास्टर्स असोसिएशन ऑफ बेलगाम या संस्थांच्या पुढाकाराने बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे धर्मगुरू बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली. आज सायंकाळी बेळगावात मूक फेरी काढण्यात आली. आरटीओ सर्कलपासून फेरीला प्रारंभ झाला. त्यानंतर कोर्टासमोरून चन्नम्मा चौकापर्यंत ही फेरी काढण्यात आली. यावेळी मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या अत्याचारांचा आणि जैन मुनी आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या क्रूर हत्येचाही निषेध करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस म्हणाले की, ३ मेपासून मणिपूरमधील ख्रिश्चन समुदायावर अत्याचार करण्यात येत आहेत. दोन आदिवासी गटांमधील हा संघर्ष असला तरी आदिवासींना आधुनिक शस्त्रास्त्रे कोण पुरवली हे कोडेच आहे. समाजमाध्यमांवर बंदी असल्याने नेमके सत्य काय कळणेदेखील कठीण झाले आहे. दोन्ही आदिवासी गट ख्रिश्चन असून, दोन्ही गटांच्या चर्चेसची मोडतोड करण्यात आली आहे. आजवर तेथील संघर्षात १४० लोक मारले गेले आहेत तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. तेथे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून विस्थापितांचे पुनर्वसन करावे अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे हिरेकोडी नंदी आश्रमाचे जैन मुनी आचार्य कामकुमार यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करून सर्वच धर्माच्या धर्मगुरूंना संरक्षण द्यावे अशी मागणी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी केली.


यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बेळगाव आणि परिसरातील कॅथॉलिक आणि मेथॉडिस्ट पंथीय ख्रिश्चन महिला, पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: