Belagavi

विरोधकांनी आधी आपल्यातील अंतर्गत वाद मिटवावेत : लक्ष्मी हेब्बाळकर

Share

जाहीर केल्याप्रमाणे सर्व पाच गॅरंटी पूर्ण करण्यास आम्ही सक्षम आहोत, ऑगस्टपासून गृहलक्ष्मी योजनेचा लाभ देण्याविषयी चर्चा झाली आहे. सरकारविरोधात आंदोलन करतो म्हणणाऱ्या विरोधी पक्षांनी ते जरूर करावे, पण आधी आपल्यातील अंतर्गत वाद मिटवावेत असा पलटवार महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
बेळगावात रविवारी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, काँग्रेस सरकार दिलेल्या सर्व गॅरंटी पूर्ण करण्यास समर्थ आहे. स्त्रीशक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती योजनांची अमलबजावणी आम्ही सुरु केली आहे. अन्नभाग्य योजनेला केंद्राने तांदूळ देण्यास नकार देऊनही आम्ही तांदळाऐवजी रक्कम देण्यास सुरवात केली आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी येत्या १४ तारखेपासून नोंदणी सुरु होईल. ३ किंवा ४ जुलैला योजना लागू होईल असे त्यांनी स्पष्ट केले.


केंद्राच्या जीएसटीप्रमाणे राज्यात वायएसटी (यतींद्र-सिद्दरामय्या टॅक्स) सुरु झाल्याच्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, कुमारअण्णा माझ्यापेक्षा मोठे आहेत, राजकीय मुत्सद्दी आहेत. त्यांनाही राज्य चालवायचा अनुभव आहे. ते कोणत्या अर्थाने बोललेत माहित नाही, त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, पण सरकार सत्तेत येऊन अवघा एक महिना पाच दिवस झाले आहेत. लोकांनी मोठ्या अपेक्षेने आम्हाला सत्ता दिली आहे. त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. त्यासाठी थोडा वेळ द्या, सरकारला काम करू द्या, पण एवढ्यातच अशी टीका करणे चूक आहे असे त्यांनी सांगितले.
उद्यापासून सुरु होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी जरूर आंदोलन करावे, पण त्याआधी आपल्यातील अंतर्गत वाद, मतभेद मिटवावेत असा पलटवार त्यांनी केला. जनतेला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आम्ही पूर्ण करू, पुढील काळात त्यादृष्टीने काम करू असे त्यांनी सांगितले.
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे ग्रामीणमधील १२००हुन अधिक शेतकऱ्यांनी रिंगरोड सारख्या विकासकामांना समर्थन दिले आहे. त्यांना जमिनीसाठी बाजारभावापेक्षा ३-४ पट अधिक भरपाई देऊन त्यांचे मन वळवू, येत्या काही दिवसांत ग्रामीण मतदारसंघात मोठ्या संख्येने रोजगार निर्माण करू असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम आदी उपस्थित होते.

Tags: