वीजदरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी बेळगाव परिसरातील विणकरांनी आज शहरात भव्य बाईक रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
होय, वीज दरवाढीमुळे राज्यात जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आधीच वस्त्रोद्योग संकटात असल्यामुळे व्यावसायिक विणकरांनाही वीज दरवाढीचा फटका बसला आहे. त्यामुळे वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगाव परिसरातील विणकरांनी आज शहरात भव्य बाईक रॅली काढून आंदोलन केले. कर्नाटक व्यावसायिक विणकर संघटनेच्या नेतृत्वाखाली खासबागमधील बसवेश्वर सर्कलपासून बेळगावातील चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या विणकरांनी जोरदार घोषणा देत आंदोलन करत विजेचे दर कमी करावेत अशी मागणी केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विणकर नेते गजानन गुंजेरी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून आधी कोविड व नंतर अतिवृष्टी, महापूरसारख्या संकटांमुळे विणकरांची कंबरडे मोडले आहे. आम्ही विणलेल्या साड्याना बाजारपेठ नाही. तशातच सरकारने वीज दरवाढीचा बडगा उगारल्याने वस्त्रोद्योग आणि पर्यायाने विणकर डबघाईला येण्याची चिन्हे आहेत. वीजमागांना आधी 40 रुपये मिनिमम चार्ज होता, तो 80 रुपये करून पुन्हा 140 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. वीजदर प्रति युनिट 1.25 रुपयांवरून 2.55 रुपये इतका वाढवला आहे. सगळे मिळून 6.50 रुपये प्रति युनिट दर आकारण्यात येत आहे. हा विणकरांवर अन्याय आहे. सरकारने आणि मुख्यमंत्र्यानी ही दरवाढ मागे घ्यावी. सरकारने दिलेल्या 5 गॅरंटी योजना स्वागतार्ह असल्या तरी वीज दरवाढ करून विणकरांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे दरवाढ कमी करण्यासाठी आम्ही सरकारला 15 दिवसांची मुदत देतो, त्या अवधीत वीज दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गुंजेरी यांनी दिला.
व्यंकटेश सोनटक्की यांनी सांगितले की, विणकरांना किमान चार्च आणि एफएसी फी दोन्ही आकारते, शिवाय वीजबिलही घेते. म्हणजे राबून कमावलेला सगळं पैसा सरकारला, हेस्कॉमलाच द्यायचा का? त्यामुळे किमान चार्च आणि एफएसी फी दोन्ही रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी विणकरांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला वीजदरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. रॅली आणि निदर्शनात वडगाव, खासबाग, जुनेबेळगाव, शहापूर आदी भागातील विणकरांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.


Recent Comments