Belagavi

 मुलांना पर्यावरणाबाबत जागरूक करा : एम. जी. हिरेमठ

Share

मुलांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी सर्वांनी रस घ्यावा, असे आवाहन बेळगावचे सेवानिवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी केले.

ते मंगळवारी बेळगावातील रामतीर्थ नगर येथे स्नेह समाज सेवा संघ व वन्यजीव, पर्यावरण विकास संघ यांच्या वतीने पर्यावरण दिन व सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात रोप लागवड केल्यानंतर बोलत होते.
समाजात मिळणाऱ्या मान-सन्मानातून आपल्या गुणवंत सेवेची ओळख होऊ शकते, तसेच आपण केलेली चांगली सेवा निवृत्तीनंतरही विसरता येणार नाही, या सन्मानाबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले.

प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य वनाधिकारी बसवराज पाटील यांनी रोपटे वाढवणे हा प्रत्येकाचा छंद असायला हवा, असे सांगून बालपणीचे क्षण हिरेमठ यांच्यासोबत शेअर केले. नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी हिरेमठ यांचे कौतुक केले.
सुरेश उरबीनहट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर डी एन मिसाळे यांनी एम जी हिरेमठ यांच्या कार्यक्षम सेवा गुणांबद्दल सांगितले. यादव फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव व्यासपीठावर उपस्थित होते


कार्यक्रमात नीरलगी मठ, जगदीश मठ, प्रा. मारुती कदम, प्राचार्य उदयसिंग राजपूत, मल्लेश रोट्टी, रवी कुलकर्णी, प्रा. ए. के. पाटील, सचिव महेश चित्तगी, उपाध्यक्ष एस. जी. कल्याणी, सदस्य कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: