आधुनिक जगात श्रीमंत आणि गरीब असे दोघेही राहतात. परंतु, वैचारिक सामंजस्य नसल्याने आपण देव ओळखू शकत नाही, असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेळगावातील अकॅडेमि ऑफ कंपॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिसर्चतर्फे (एसीपीआर) हिंदवाडीतील गुरुदेव रानडे मंदिर येथे डॉक्टर आर डी तथा गुरुदेव रानडे यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त एसीपीआरच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात भाग घेऊन बोम्मई बोलत होते.
सामंजस्याने जीवन जगल्यास एक नवीन जग पाहता येईल. देवच आपला सृष्टिकर्ता आहे. पण त्याने सृष्टी निर्माण केली आणि सोडून दिले नाही. तो आपल्यासोबत आहे. पण, त्याची ओळख पटवण्याऐवजी आम्ही त्याला शोधण्याचे काम करत आहोत असे बोम्मई म्हणाले.
मी जे शिकलो ते म्हणजे अभियांत्रिकी, पण राजकारणात आलो. राज्यकारभारासाठी अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला या दोन गोष्टींमध्ये जास्त रस आहे असे त्यांनी सांगितले.

शेगुणशी मठाचे डॉक्टर महांतप्रभू स्वामीजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे दिवंगत सिद्धेश्वर स्वामीजी लिखित विशेष कृतींचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे “शिवशरणींचा परमार्थ मार्ग” या विषयावर महिलांचा परिसंवाद झाला. त्यात प्रौढ शिक्षण अधिकारी ए एम जयश्री आणि केके कोप्प सरकारी पब्लिक शाळेच्या प्राचार्या डॉक्टर दानम्मा झळकी यांनी विशेष व्याख्यान दिले.
यावेळी अकॅडेमि ऑफ कंपॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिसर्चचे अध्यक्ष ऍडव्होकेट अशोक पोतदार, सचिव ऍडव्होकेट एम बी जिरली यांच्यासह एसीपीआरचे सभासद व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments