कर्नाटकात सत्ता हाती घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर काँग्रेसने शुक्रवारी 24 मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी आज पार पडला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्दरामय्या मंत्रिमंडळातील त्या एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत.

कर्नाटक सरकारमध्ये एकूण 34 मंत्री असतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह दहा जणांनी 20 मे रोजी शपथ घेतली असून उर्वरित 24 मंत्र्यांचा शपथविधी आज राजभवनात झालेल्या शानदार समारंभात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एच. के. पाटील, एन. चेलुवरायस्वामी, कृष्णा बैरेगौडा, के. व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांड्रे, क्यातसंद्रा एन. राजन्ना, दिनेश गुंडूराव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, मंकाल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, रामप्पा बाळप्पा तिम्मापुर, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, डॉ. शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, संतोष लाड, एन. एस. बोसराज, बैरती सुरेश, मधु बंगारप्पा, डी. नागेंद्र, डॉ. बी. आर. सुधाकर, बैरती सुरेश या 24 आमदारांनी यावेळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
राजभवनात प्रथमच घुमला शिवरायांचा आवाज !
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शपथ घेतली. जगद्गुरू बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आई गिरिजादेवी हट्टीहोळी आणि मतदारसंघातील जनतेच्या नावाने त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणा देत एकच जल्लोष केला.
आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. आपापल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या नावाचा जयघोष ते करत होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत मुख्यमंत्री सिद्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी शपथ घेतलेल्या नव्या मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्याच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments