Belagavi

बेळगावात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Share

अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी रात्री बेळगावकरांची दाणादाण उडवली. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शहरातील अनेक भागात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. मात्र सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


सोमवारी दिवसभर बेळगाव परिसरात असह्य उकाडा जाणवत होता. त्यामुळे लोक हैराण झाले होते. रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान, पावसाचा हलकासा शिडकावा सुरू झाला. मात्र त्यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरवात झाली. पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक होता. धूळ आणि कचरा उडून समोरचे काहीच न दिसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अशा वातावरणात रस्त्यावर वाहने चालविणेही कठीण होऊन गेले होते. हळूहळू काही वेळातच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पांगल्याचे दिसून आले.

पावसामुळे शिवबसव नगर, गॅंगवाडी परिसरातील काही झोपड्या, छोट्या घरांवरील पत्रे उडून गेले. हे पत्र दुसऱ्या घरांवर पडल्याने घरावरील कौले, छत फुटले. त्यामुळे सहा घरांचे नुकसान झाले. येथील रहिवासी उमेश तोळजकर व बाळकृष्ण तोळजकर यांच्या घराचे सिमेंटचे छत उडून गेले तर मीना चौगुले, निकिता चौगुले, डॉन चौगुले, अजयसिंग राजपूत, काशवा तलवार यांच्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी अन्यत्र आसरा घेतला आहे. सखल भागात अनेक घरांत पाणी घुसले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. तशातच वीज गायब झाल्याने नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली.

याबाबत माहिती देताना गॅंगवाडी येथील डॉन चौगुले आणि कैलास रंजन सकट यांनी ‘आपली मराठी’ला सांगितले की, रात्र दहाच्या सुमारास या परिसरात जोरदार वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. त्यामुळे घरांवरील पत्रे उडून छतांवर पडल्याने कौले फुटली तसेच भिंतींनाही तडे गेले आहेत. यावेळी आमच्या घरात लहान मुले होती. त्यांना घेऊन आम्ही दुसरीकडे आसरा घेतला. त्यामुळे मुले बचावली हे नशीब. पावसाने आमचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला योग्य भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, काशव्वा बसाप्पा तळवार या वृद्ध महिलेने सांगितले की, पावसामुळे आमच्या घरांवरचे पत्रे उडून गेले. त्यामुळे घरात धूळ-माती येत आहे. पावसामुळे घरात पाणी साचले. आम्ही रात्री जेवणही केले नाही. जीव मुठीत धरून आम्ही रात्र काढली आहे. आम्हाला मुले नाहीत. दोघे वृद्ध पती-पत्नीच असतो. आमचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला योग्य भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर हिंडलगा गणपती मंदिराजवळ अर्गन तलाव परिसरातील झाडे रस्त्यावर कोसळल्याने बराच काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वाहनचालकांचे विशेषतः दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या, पानगळ यातून वाट काढताना त्यांना नाकीनऊ आले. काल झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील शहापूर, वडगाव, क्लब रोड, सदाशिव नगर व इतर अनेक भागात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले.
एकंदर, कुंदानगरी बेळगावात काल रात्री जोरदार वारा आणि पाऊस यांचे थैमान बघायला मिळाले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

Tags: