कर्नाटकाच्या नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे निमंत्रण नियुक्त उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.

बेंगळुरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना डीकेशी म्हणाले की, उद्या कंठीरव मैदानावर नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी सर्वांनी सकाळी 11 वाजण्यापूर्वी मैदानावर उपस्थित रहावे. कारण त्यानंतर व्हीआयपींची वर्दळ सुरु होईल. त्यामुळे इच्छुकांना प्रवेश न मिळण्याची शक्यता आहे. या लोकशाहीच्या ऐतिहासिक सोहळ्याला राज्यातील कार्यकर्ते, नेते, सर्व विरोधी पक्षांचे नेते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटी या विनाशर्त असतील का सशर्त या प्रश्नावर या गॅरंटी काँग्रेसने दिलेल्या ठाम गॅरंटी आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी स्वतः येऊन या गॅरंटी दिल्या आहेत. त्यांचे स्वरूप लवकरच जाहीर करू पण दिलेला शब्द आम्ही नक्की पाळू, असे त्यांनी सांगितले. नवं मंत्रिमंडळ रचनेसंदर्भात मी व सिद्दरामय्या दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल व प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहोत. या भेटीनंतर सगळा तपशील जाहीर करू असे शिवकुमार यांनी सांगितले.
एकंदर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला सर्वच विरोधी पक्षांनीही येण्याचे निमंत्रण डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.


Recent Comments