बेळगाव दक्षिण मतदार संघातील मतदारांनी गुंडगिरी, दादागिरीला नव्हे तर विकासाला साथ दिली आहे, माझा हात सोडला नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया बेळगाव दक्षिणचे आमदार व भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी दिली.
बेळगावातील आरपीडी महाविद्यालयात झालेल्या मतमोजणीत आपला विजय निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या आयुष्यात कधी एकमेकांचे तोंडही न पाहिलेल्या पक्षांनी एकत्र येऊन माझा पराभव करण्याचा प्रयत्न केला. गुंडगिरी केली. इतकेच काय तर तुष्टीकरणासाठी नमाज पडण्याचे प्रकारही झालेत. या गोष्टीत मला जायचे नाही. लोकांनी भाजपच्या विचाराला, अभय पाटलांच्या विकासाला साथ दिली. मी केलेला विकास पाहून मतदान केले. माझा हात सोडला नाही. आपला मुलगा, भाऊ विधानसभेत गेला पाहिजे म्हणून मतदान केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे असे अभय पाटील म्हणाले. तुम्ही जिंकलात पण राज्यात भाजपची पीछेहाट झाली, त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली नाही का? या प्रश्नावर, अजून मतमोजणी संपायला अवकाश आहे. निकालानंतरही घडामोडी घडणार आहेत. पण त्यावर मला बोलायचे नाही. संपूर्ण निकाल आल्यावर बोलेन असे त्यांनी सांगितले.
एकंदर, आपल्या विकासकामांमुळे लोकांनी निवडून दिल्याचे सांगत अभय पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
Belagavi
लोकांचा आभारी, त्यांनी विकासाला साथ दिली, गुंडगिरीला नाही : अभय पाटील


Recent Comments