राज्यात सुमारे 120 आणि बेळगाव जिल्ह्यात 15 जागा जिंकून पुन्हा एकदा कमळ फुलेल असा विश्वास विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
गोकाक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी म्हणाले की, यावेळी देखील राज्यात भाजपला 120 जागा मिळतील तर काँग्रेसला 80पर्यंत जागा मिळतील. त्यातूनही त्यांचे वीसेक आमदार फुटून बाहेर पडतील आणि सरकार भाजपच स्थापन करेल असा दावा त्यांनी केला. गोकाकमध्ये रमेश जारकीहोळी यांना लोकांचा आशीर्वाद आहे.
ते सहज निवडून येतील. राज्यातील कोणतेही बडे नेते त्यांच्या पराभवासाठी गोकाकमध्ये धूळ झाडून गेले असले तरी काही फरक पडणार नाही. ते नेते दूरचे रिश्तेदार, स्थानिक परिस्थिती काय आहे हे त्यांना कसे माहित असणार असा सवाल त्यांनी केला. त्याशिवाय रमेश यांच्या प्रयत्नाने बेळगाव जिल्ह्यात भाजप किमान 15 जागा सहज मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रमेश जारकीहोळी यांना ब्लॅकमेल करण्याबाबत धमकावल्याच्या आणि सीडीप्रकरणी प्रतिक्रिया देताना सीडी प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. केवळ रमेशच नव्हे तर अनेक सामान्य लोक सीडी प्रकरणात अडकले आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. रमेश ताकदवान आहेत, यातून बाहेर पडतील. डीकेशी याना काँग्रेस विजयी होवो किंवा पराभूत, काही फरक पडत नाही.
त्यांना फक्त कनकपूर आणि बेळगाव ग्रामीणमध्ये विजय हवाय अशी बोचरी टीका लखन यांनी केली. ‘रमेश जारकीहोळी यांचा मेंदू अन जीभेशी संबंध सुटलाय’ या लक्ष्मण सवदी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, सवदी यांचीच अवस्था तशी झाली आहे. पराभवाच्या भीतीपोटी ते बोलत आहे. काय बोलत आहेत अन काय नाही हे त्यांचे त्यांनाच समजत नाही. महेश कुमठळ्ळी चांगले नेता आहेत, ते अथणीतून नक्की निवडून येतील असा विश्वास लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
एकंदर, गोकाकमध्ये बंधू रमेश जारकीहोळी सहज निवडून येतील आणि राज्यात व बेळगाव जिल्ह्यात यावेळी कमळ पुन्हा एकदा फुलून येईल असे सांगताना सरकार स्थापनेवेळी काँग्रेस फुटेल असे भाकीत विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.


Recent Comments