देशाची एकता, अखंडता कायम ठेवण्यासाठी झटणाऱ्या बजरंग दल या राष्ट्रभक्त संघटनेवर भाजप कोणालाही. कोणत्याही परिस्थितीत बंदी घालू देणार नाही असे पक्ष प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली यांनी सांगितले.

बेळगावात पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ऍड. जिरली म्हणाले की, बजरंग दलाने नेहमीच राष्ट्रविरोधी शक्तींच्या, कृत्यांच्या विरोधात काम केले आहे. विशेषतः लव्ह जिहाद, गोहत्या, गरीब हिंदूंचे फसवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी संघर्ष केला आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत बजरंग दलावर बंदी घालू देणार नाही. अशा देशभक्त संघटनेवर बंदी घालण्याची काँग्रेसची भाषा लोकशाहीविरोधी आहे. त्याचा भाजप तीव्र निषेध करतो. या विधानाबद्दल काँग्रेसने सर्व रामभक्त, बजरंग बली भक्तांची तातडीने बिनशर्त माफी मागावी अशी मागणी जिरली यांनी केली.

काँग्रेसने भ्रष्टाचारावर बोलण्यास सुरवात केली आहे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ऍड. जिरली म्हणाले की, बोफोर्स, 2 जी घोटाळा, कॉमन वेल्थ गेम्स अशा अनेक भ्रष्टाचाराच्या 26 प्रकरणात न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही तिहारची वारी केली आहे. अशा लोकांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे, ‘राक्षसाच्या तोंडी भगवद्गीता’ असा प्रकार आहे. खुद्द काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी, केंद्राच्या 1 रुपये अनुदानातील तब्बल 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, मूळ लाभार्थ्याला केवळ 15 पैसे मिळतात असे सांगून, काँग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची जाहीर कबुली दिली होती. अशा काँग्रेसने भ्रष्टाचारावर बोलणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. आता तर काँग्रेसने मोठया वर्तमानपत्रात भाजप सरकार ट्रबल सरकार असल्याची जाहिरातबाजी केली आहे. अयोध्येत राममंदिर उभारणे, काश्मीरमधून कलम 370 हटविणे, गोहत्या बंदी कायदा करणे हे यांना त्रासदायक वाटते का असा सवाल त्यांनी केला.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी माझ्याकडून 50 हजार रुपये हातउसने घेऊन जाणारी काँग्रेसची महिला नेता आज करोडोंची मालकीण आहे. त्यांचे उद्योग आहेत, पार्टनरशिप आहे म्हणे, असेलही. पण बेळगावात राहून कनकपूरच्या व्यक्तीसोबत कशी काय पार्टनरशिप असते? एकवेळ हा त्यांचा वैयक्तिक विषय मानू, पण त्यांनी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे कळस झाला, टीका करताना त्यांनीही सांभाळून करावी अशी टीका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला महानगर भाजप अध्यक्ष आ. अनिल बेनके, माध्यम समन्वयक शरद पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments