मोठी विकासकामे करणारे डबल इंजिन सरकार असा दावा करणारा भाजप विकासकामांवर मते मागण्याऐवजी जाती-धर्मांत फूट पाडून मते मागत आहे. यातून भाजप अप्रत्यक्षपणे आपले अपयश कबूल करत आहे अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी बेळगावात आलेल्या अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसने या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे सांगून त्याचे स्वागत केले. प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2 हजार रुपये, अन्नभाग्य योजनेत बीपीएल कुटुंबांना दरमहा 10 किलो रेशन, युवानिधी योजनेत बेरोजगार पदवीधारकांना दरमहा 3 हजार आणि डिप्लोमाधारक बेरोजगार तरुणांना दरमहा 1500 रुपये भत्ता आणि महिलांना मोफत बसप्रवास या सर्व योजना पाहिल्या तर एखाद्या सामान्य व्यक्तीला, कुटुंबाला रोज लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसच्या आश्वासनांना रेवड्या म्हणून हिणवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी, 2014 मध्ये काळा पैसे जमा करून देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे, बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आणि पेट्रोल-डिझेल-गॅस स्वस्तात देण्यासह अनेक आश्वासनांची खैरात केली होती. त्या रेवड्या नाहीत तर काय होते असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
कर्नाटकात विकासाच्या मुद्द्यावर मते मागता येत नाहीत म्हणून लोकांची दिशाभूल करण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आरक्षणवाढीचा मुद्दा उचलून धरत आहे. पण हे आरक्षण बिनकामाचे आहे. त्यांनी दिलेले आरक्षण ना ही लिंगायत अन ना ही वक्कलिग समाजाच्या फायद्याचे आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण काढून घेऊन दुसऱ्या समाजाला देणे चुकीचे आहे. केंद्रातील भाजप सरकारनं राज्यांना आरक्षणवाढीचा अधिकार दिला असला तरी तो उपयोगाचा नाही. कारण आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडू नये असा सर्वोच्च न्यायालयाचा दंडक आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणे गरजेचे होते. आरक्षणाची मर्यादा 50% वर नेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल असे आश्वासन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यात दिले आहे याचे मी स्वागत करतो असे ते म्हणाले. भाजपने कितीही दावे केले तरी, गेल्या 5 वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात कर्नाटकातील प्रशासकीय यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे येत्या 10 मे रोजी जनता त्यांना योग्य उत्तर देईल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी असताना शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावात येऊन महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांचा प्रचार करतात, राष्ट्रवादी कर्नाटकात निवडणूक लढवते याकडे लक्ष वेधल्यावर अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसची कर्नाटकात कोणाशीही युती नाही. त्यामुळे येथे प्रत्येक पक्षाला आपली भूमिका, मते मांडण्याचा हक्क आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे कदाचित तो पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी 8-9 उमेदवार उभे केले असावेत असे त्यांनी सांगितले. बजरंग दलावर बंदी घालायच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर कर्नाटकात मंदिरात हनुमान चालीसा पठण आयोजित केल्याच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, आम्हीसुद्धा देवाची प्रार्थना करतो, प्रत्येक धर्माचा नागरिक आपापल्या देवतांची पूजा करतो. पण त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची काय गरज? गेली पाच वर्षे कोणी रोज हनुमान चालीसा पठण करत असेल गोष्ट वेगळी पण आता निवडणुकीच्या काळातच हनुमान चालीसा कशी काय आठवते असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी व काँग्रेस नेते उपस्थित होते.


Recent Comments