election

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गॅरंटी कार्डांचा पुनरुच्चार; खर्गे यांनी केले प्रकाशन

Share

STATE CONGRESS RELEASE ELECTION MANIFESTO

10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाच वर्षांत 1.5 लाख कोटी, ओबीसी जनगणना अहवालाची अंमलबजावणी, बेरोजगार तरुणांना भत्ते, महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा दोन हजार रुपये आणि जन कल्याणकारी योजनांचे आश्वासन दिले.
‘सर्व समुदायांचे शांततापूर्ण उद्यान’ या नावाचा जाहीरनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते बेंगळुरू येथे जारी करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, एआयसीसी सरचिटणीस व कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, जाहीरनामा रचना समितीचे अध्यक्ष डॉ. जी. परमेश्वर आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते.

पक्षाच्या हमींचा पुनरुच्चार करताना गृह ज्योती (दोनशे युनिट मोफत वीज), गृह लक्ष्मी (महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा 2,000 रुपये), अन्नभाग्य (बीपीएल कुटुंबांना दरमहा दहा किलो तांदूळ), युवानिधी (बेरोजगार भत्ता) आणि शक्ती (महिलांसाठी राज्यांतर्गत मोफत प्रवास) या योजनेची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे.

याशिवाय आणखी दहा आश्वासनांचा त्यात समावेश आहे. कल्याण कर्नाटक, कित्तूर कर्नाटक, कोस्टल कर्नाटक, मालेनाडू प्रदेश आणि बेंगळुरू शहरांसाठी स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. या जाहीरनाम्यात कर्नाटकच्या जनतेला अनेक भरघोस योजना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सध्याचे एकूण आरक्षण 50% वरून 75% पर्यंत वाढवण्याचे महत्त्वपूर्ण वचन कॉंग्रेसने दिले आहे.
काँग्रेसने जाहीरनाम्यातील यादीत एससी-एसटी आरक्षणासह आरक्षण 50% वरून 75% पर्यंत वाढवण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. SC चे आरक्षण 17%, ST चे आरक्षण 17% पर्यंत वाढले. ते 7 पर्यंत वाढणार असल्याचे सांगितले. तसेच अल्पसंख्याकांसाठी ४ टक्के आरक्षण बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे.

अलीकडे कर्नाटकात जातीय आरक्षणाचा संघर्ष गाजत होता. पंचमसाली, कुरुबा, ओक्कलिगा समाजासह अनेक समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले. आरक्षणामुळे भाजप राज्य सरकार अडचणीत आले आहे. असे असताना काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचे हत्यार वापरले आहे.

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीरनामा प्रकाशित करताना जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब असलेला जाहीरनामा काँग्रेसने जारी केल्याचे सांगितले. केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातून अनेक ठिकाणांहून लोकांनी मला फोन करून काँग्रेसच्या गॅरंटी कार्डचे स्वागत केले आहे, राज्याला विकासाच्या राजमार्गावर नेण्याचा संकल्प करून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे खर्गे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, काँग्रेसच्या पवित्र जाहीरनाम्याचे आज धर्म-संस्कृतीनुसार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रकाशित केला आहे. राज्यातील जनतेला सुशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यभरातील जनतेच्या सूचना, आशा-आकांक्षांचा समावेश यात केला आहे. खेड्यांपासून महानगरापर्यंत प्रत्येक ठिकाणांचा विकास करून ग्लोबल कर्नाटकचे स्वप्न साकार करण्यासाठीचा संकल्प यात केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेस विधिमंडळ गटनेते सिद्दरामय्या म्हणाले, दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे. गेल्यावेळी मी मुख्यमंत्री असताना आम्ही १६५ वचने जनतेला दिली होती. त्यापैकी १५८ आश्वासने आम्ही पाळली. दुसरीकडे भाजपने ६०० आश्वासने दिली होती. त्यापैकी केवळ ५५ पाळली आहेत. शेतकऱ्यांना दिलेली अनेक आश्वासने पाळलेलीच नाहीत. एससीएसटी, मागासवर्ग, वंचित वर्गांच्या प्रगतीसाठी आम्ही एससीपीडीपी कायदा आणला. तसा कायदा देशातील कुठल्याही राज्यात नाही. भाजप-मोदी केवळ दलितांच्या विकासाच्या घोषणा करतात. पण त्यांवर अमल करत नाहीत, भाजप नेहमीच सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रारंभी काँग्रेसच्या प्रचारगीताचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते हळदी-कुंकू वाहून पूजन करून मग प्रकाशन करण्यात आले.

Tags: