भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याचा सर्वप्रथम उद्घोष बसवण्णा यांनी केला अशी स्तुती परदेशी अभ्यासकांनीही केली आहे. लिंगायत धर्माची पताका फडकवत ठेवण्यासाठी बसवण्णा यांच्या वचनांचा जगभरात प्रसार व प्रचार करण्याची गरज आहे असे मत शेगुणसी विरक्त मठाचे डॉ. महांत महास्वामी यांनी केले.
बेळगावातील नागनूर रुद्राक्षी मठात बसव जयंतीनिमित्त आयोजित लिंगायत मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. महांत महास्वामी पुढे म्हणाले की, भारताचा इतिहास खूप मोठा आणि समृद्ध आहे. या संपूर्ण इतिहासात मानवी स्वातंत्र्याचा सर्वप्रथम उद्घोष विश्वगुरू बसवण्णा यांनी केला अशी स्तुती परदेशी अभ्यासकांनीही केली आहे. बसवण्णा यांनी समताधारित समाज निर्मितीची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे आचारविचार, वचनातून मांडलेले सिद्धांत यांचा जगभरात प्रसार झाला पाहिजे. लिंगायतसंस्कृती, संप्रदाय टिकविण्यासाठी ते आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार म्हणाले की, सनातन वैदिक धर्म, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्याप्रमाणेच लिंगायत धर्माचे स्वतःचे असे तत्वज्ञान, संस्कृती, संगीत, नृत्य आहे. त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वचन साहित्याचे रक्षण तत्कालीन लिंगायत मठ आणि प्रतिष्ठित लिंगायत घराण्यांनी जतन केल्यामुळे झाले. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने वचन साहित्याचे जतन करणे सोपे झाले आहे. त्यादृष्टीने लिंगायत संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत.

नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, कारंजीमठाचे डॉ. गुरुसिद्ध स्वामी, कडोली दुरदुन्डेश्वर मठाचे बसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्यात कार्यक्रम झाला. जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी अध्यक्षस्थानी होते. शहर अध्यक्ष एस. जी. सिदनाळ, राष्ट्रीय बसवसेनेचे अध्यक्ष शंकर गुडस, जागतिक लिंगायत महासभा महिला विभाग जिल्हाध्यक्ष प्रेमा अंगडी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुरगेप्पा बाळी यांनी स्वागत केले. डॉ. आडीवेप्पा इटगी यांनी आभार मानले.


Recent Comments