काँग्रेस नेते सिद्दरामय्या यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळेच ते कधी हिंदुविरोधी, तर कधी लिंगायत विरोधी बेताल विधाने करत सुटले आहे असा आरोप भाजपचे राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली यांनी केला.
बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना ऍड. जिरली म्हणाले की, बसवराज बोम्मई यांनी आपल्या कार्यशैलीने संपूर्ण दक्षिण भारतातच एक कुशल प्रशासक, उत्तम मुख्यमंत्री म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळे सिद्दरामय्या याना ही बाब सहन होत नाहीय. त्यातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळेच ते कधी, धर्मस्थळसारख्या पवित्र मंदिरात मांस खाऊन जातो म्हणतात तर कधी लिंगायत आणि हिंदूंच्या विरोधात बेताल विधाने करतात असा आरोप जिरली यांनी केला.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी एल महिला उमेदवाराचा एकेरी व अवमानास्पद उल्लेख केल्याच्या प्रश्नावर, महिलांना सर्वच धर्मात, पंथात सन्मानाचे स्थान दिले आहे. हे सर्वानीच लक्षात घेतले पाहिजे. संजय पाटील कोणत्या संदर्भात बोललात हे माहिती नाही. परंतु तसे बोलले असतील तर ते चुकीचे आहे असे जिरली यांनी सांगितले. भावी मुख्यमंत्री लिंगायत समाजाचा असेल असे वक्तव्य कोणी करू नये अशी सूचना अमित शाह यांनी दिल्याचा इन्कार जिरली यांनी केला. प्रथेप्रमाणे निवडून आलेले भाजप आमदार आपसात चर्चेने कोण मुख्यमंत्री व्हायचे हे ठरवतील असे त्यांनी सांगितले.
चिक्कोडी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान मोदी प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा दौरा अद्याप अंतिम झालेला नाही. याबाबत माहिती घेऊन प्रसारमाध्यमांना दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र चिक्कोडी भागात भाजप रयत मोर्चाचा एक मोठा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी रयत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत. याबाबत एक-दोन दिवसांत घोषणा करण्यात येईल असे जिरली म्हणाले.
यावेळी बोलताना आ. अनिल बेनके यांनी मराठा समाज भाजपवर नाराज असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. बेळगाव ग्रामीणमध्ये मराठा उमेदवार दिला आहे. उत्तरमध्ये लिंगायत समाजाचा उमेदवार दिला आहे.
सगळीकडे एकाच समाजाचा उमेदवार कोणालाही देता येत नाही. सगळी समीकरणे जुळवून हे निर्णय घ्यावे लागतात. जिथे नाराजी आहे, तेथे आम्ही पक्षाच्या वरिष्ठांसह जाऊन ती दूर करू असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बेळगावात येऊन भाजप उमेदवारांच्या प्रचार करण्याला म. ए. समितीने हरकत घेतल्याच्या मुद्द्यावर, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्ष सांगेल तेथे नेते जाऊन प्रचार करतात. आम्हीही महाराष्ट्रात, गोव्यात जाऊन प्रचार करतो. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी येथे येऊन प्रचार करायला हरकत घेण्याची गरज नाही असे आ. बेनके यांनी सांगितले.


Recent Comments