खानापुरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाचा नाम फलक काढण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला. त्याला समिती नेते व कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत नियम पाळून फलक उभारल्याचे ठणकावून सांगितले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर शहरात संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या डोळ्यात मराठी खुपते आहे. त्यामुळेच निवडणूक अधिकाऱ्यांनी हा फलक काढण्याची सूचना नुकतीच केली होती. त्याला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा फलक काढण्याची सूचना केली.
त्यामुळे समिती नेते व कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जोरदार आक्षेप घेत धारेवर धरले. आम्ही नियमाला धरून कार्यालय सुरु करून फलक उभारला आहे. तुम्ही नोटीस वगैरे न देता अचानक कसे काय बोर्ड काढण्याची जबरदस्ती करता असा सवाल समिती नेते यशवंत बिर्जे आणि मुरलीधर पाटील आदींनी केला.
एकंदर निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात समिती कार्यकर्त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments