सर्वत्र डौलाने फडकणारे मराठी अस्मितेचे प्रतीक असणारे भगवे झेंडे, भगवे फेटे आणि टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते, ढोल-ताशांचा दणदणाट, मराठी अस्मितेच्या घोषणा, छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत बैलगाडीतून काढलेल्या भव्य मिरवणुकीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणमधील उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त बेळगावात जणू भगवे वादळच अवतरल्याचा भास झाला.
बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर समिती नेत्यांसह तहसीलदार कार्यालयात जाऊन समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले म्हणाले की, गेली 66 वर्षे मायभूमी महाराष्ट्रात जाण्यासाठी बेळगावसह सीमाभागातील मराठी जनता संघर्ष करत आहे. बेळगाव मराठी भाषिकांचे होते, आहे आणि पुढेही राहणार आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत. निवडणूक जिंकून सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या खटल्यात पुरावा देणार आहोत. सीमाभागातील शेतकरी, युवक, महिला वर्गासोबत भव्य संख्येने आम्ही अर्ज दाखल करण्यासाठी जात आहोत. मतदारांनी सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देऊन, त्याची सोडवणूक व्हावी यासाठी सर्व पाच मतदारसंघात म. ए. समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, मराठीबहुल सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करून मराठी माणसाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 66 वर्षे लढा देत आहे. मराठी माणसासोबतच शेतकरी, गोरगरीब, युवक, महिला आणि वंचितांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचं प्रतीक असलेल्या बैलगाडीतून आम्ही अर्ज दाखल करण्यास जात आहोत. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारला चोख उत्तर देण्यासाठी या सर्व उमेदवारांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज येथे भगवे वादळ निर्माण झाले आहे. म. ए. समितीची विजयी घोडदौड सुरूच ठेवण्यासाठी समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मिरवणुकीत समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडूसकर, ऍड. अमर येळ्ळूरकर आणि मारुती नाईक तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, अध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील आदी नेते आकर्षकरित्या सजवलेल्या बैलगाडीवर उभे होते. बैलगाडीवर लावलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मुद्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, येऊन येऊन येणार कोण, समितीशिवाय आहे कोण? आदी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. म. ए. समिती तसेच श्रीराम सेना हिंदुस्थान व अन्य संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगवे फेटे आणि टोप्या परिधान करून हाती भगवे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या समितीच्या मावळ्यांमुळे बेळगावात जणू भगवे वादळ अवतरल्याचा भास यावेळी होत होता.
अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या मराठीबहुल सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी गेली 66 वर्षे अखंड संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने केवळ लोकेच्छा दाखवून देण्यासाठी सीमाभागात विधानसभा निवडणूक लढवण्याची तंत्र अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून म. ए. समिती सध्या होऊ घातलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर आणि यमकनमर्डी या मतदारसंघातून लढवत आहे. बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले, दक्षिणमधून रमाकांत कोंडूसकर, उत्तरमधून ऍड. अमर येळ्ळूरकर, यमकनमर्डीतुन मारुती नाईक आणि खानापूर मतदार संघातून मुरलीधर पाटील यांना म. ए. समितीने उमेदवारी दिली आहे. यापैकी बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले यांनी आज बेळगाव तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी बेळगाव शहर, तालुका, ग्रामीण मतदारसंघातील सर्व वयोगटातील हजारो मराठी भाषिक कार्यकर्ते जल्लोषात मिरवणुकीत सहभागी झाले होते.
एकंदर सध्या होऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही म. ए. समितीसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. काहीही करून निवडणूक जिंकायचाच असा चंग समिती नेते, कार्यकर्त्यांनी केलाय. त्यात त्यांना कितपत यश येते हे पहावे लागेल.


Recent Comments