Belagavi

भंडाऱ्याच्या उधळणीत अनगोळ विठ्ठल बिरदेवाची यात्रा भक्तिभावाने

Share

अनगोळ भाग्यनगर येथील अत्यंत जागृत, पुरातन ग्रामदेवता व धनगर (हालुमत) समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव देवालयाचा यात्रामहोत्सव भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिभावाने पार पडला.

पहिल्या दिवशी २२ खेड्यातील धनगर समाज बांधव ढोलवाद्यासह संध्याकाळी मंदिराजवळ जमले. त्यानंतर गावातीलच होळकर घराण्यातर्फे हार व सुहासिनींतर्फे सहवाद्य अंबिल व दुधाचे कलश आणल्यानंतर यात्रेला सरुवात होऊन नवस केलेल्या भाविक भक्तांचे दीड नमस्कार दंडवत घालणे व नामकरण करणे आदि कार्यक्रम झाले. नंतर गावातीलच दोन्हीही गायन संघाकडून धनगरी गाण्यांची रात्रजागरण कार्यक्रम झाला.

दुसऱ्या दिवशी पहाटे अभिषेकसह विधिवत पुजनाने यात्रेला सुरुवात झाली. सकाळी ९ नंतर ढोलवाद्यासह गावभर व प्रत्येक मंदिराला भेट देऊन पूजा करण्यासह पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी परत मंदिरजवळ आल्यानंतर मुख्य यात्रामहोत्सवाला सुरुवात झाली. पालखी मंदिर प्रदक्षिणा घालणे, भरमा मलतवाडी यांचे आलग घालणे, भाकणुक होणे आदी विधी झाले. त्यानंतर भक्तांनी श्री विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत भंडारा, खारिक, खोबरे, लोकर उधळली. नवस केलेल्या भाविकांनी खाली पडलेल्या भंडाऱ्यामध्ये लोटांगण घालणे कार्यक्रमासह विविध पारंपारिक धार्मिक विधीसह मोठ्या श्रद्धाभक्ती व आनंदोत्सहात यात्रामहोत्सव पार पडला.


यावेळी यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेबद्दल अधिक माहिती दिली.

धनगर समाज बांधवांसह सर्व जातीय असंख्य भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन महाप्रसाद स्विकारला. यात्रामहोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Tags: