गोकाक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार महांतेश कडाडी यांनी आज नामनिर्देशनपत्र सादर केले, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीने त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरला.
काँग्रेसचे गोकाक मतदारसंघातील उमेदवार महांतेश कडाडी यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. गोकाकमधील अप्सरा खूट पासून बसवेश्वर सर्कलपर्यंत समर्थक-कार्यकर्त्यांची भव्य मिरवणूक काढून कडाडी यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महांतेश कडाडी म्हणाले, मी याआधी कोणत्याही राजकीय पक्षात नव्हतो, काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडल्याने पक्षात प्रवेश केला. उमेदवारीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवल्यावर अर्ज केला. वरिष्ठांनी सर्व्हेत माझे नाव आल्याने मला उमेदवारी दिली. त्यामुळे मी निवडणूक लढवीत आहे. गोकाक मतदारसंघात बदल घडवून आणण्याची लोकांची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. काँग्रेसचे असंतुष्ट अशोक पुजारी यांची नेत्यांकडून समजूत घालण्यात आली आहे. आज त्यांचे समर्थकही माझा अर्ज दाखल करताना उपस्थित आहेत असे सांगून कोणाच्या शिफारशीवरून आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा त्यांनी इन्कार केला.

एकंदर भव्य शक्तिप्रदर्शन करून काँग्रेस उमेदवार महांतेश कडाडी यांनी गोकाक मतदार संघातून आज अर्ज भरलाय. भाजपचे उमेदवार किंगमेकर नेते रमेश जारकीहोळी यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.


Recent Comments