बेळगावात भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी आतून तडजोडीचे धोरण ठेवले आहे. बेळगावच्या जनतेने आम आदमी पक्षाला आशीर्वाद दिल्यास काँग्रेस आणि भाजपने पाच वर्षात न केलेला विकास करून दाखवून देऊ, असे आम आदमी पार्टीचे उत्तर मतदारसंघाचे उमेदवार राजकुमार टोपन्नावर यांनी सांगितले.
बेळगावातील कोल्हापूर सर्कलमधून मंगळवारी त्यांनी मोठ्या संख्येने जमलेले समर्थक आणि आप कार्यकर्त्यांसह भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीने महापालिकेत जाऊन उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. फ्लो
बेळगाव नगर विकास प्राधिकरणात (बुडा) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. गेल्या आठवड्यात कणबर्गी नवीन वसाहत रद्द केली. मोजक्याच लोकांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. मी संघर्षातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावात आणण्यासाठी मी सातत्याने लढा दिला आहे. तरुणांनी हे जाणून घेतले पाहिजे. मला संधी दिल्यास बेळगाव शहराचा विकास करून दाखवून देईन, असे ते म्हणाले.
बेळगावातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिलांची सुरक्षा, विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस, केएएस परीक्षा मोफत कोचिंग सेंटर सुरु करून बेळगावातील तरुण देशात चमकावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजप आणि उत्तरेत काँग्रेसचे आमदार असताना जातीय दंगली झाल्या. लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे. अशी अवस्था बेळगावात पुन्हा निर्माण होऊ नये. कर्नाटकात आम आदमी पक्ष वाढत आहे. बेळगावातूनच आम आदमी क्रांती घडवेल. येथून राज्यभरात सर्वात जास्त जागा येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पैसे देऊन तिकीट मिळवलेल्या उमेदवारांकडून विकासाची अपेक्षा करणे योग्य नाही. असे लोक सरकारी रुग्णालयाचा विकास मिळणार हे हास्यास्पद आहे. तसेच काँग्रेसमध्ये मुस्लीम समाजाचे बरेच लोक आहेत. त्यांच्यावरही अन्याय आहे. त्यांच्या वतीने आवाज उठवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव शहराला स्मार्ट सिटी आणि अमृतनगर योजनेमध्ये भरघोस अनुदान दिले आहे. ते अनुदान कुठे गेले? शहरातील रस्ते आणि गटारी बांधणार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. त्यांनी राष्ट्रीय पक्षाचे पैसे देऊन तिकीट मिळवले, ते जिंकले तर इथे पुन्हा लुटणार. गेल्या पाच वर्षांत भाजपचे आमदार असूनही रस्ते, नाल्यांचे बांधकाम का केले नाही, असा सवाल जनतेने करावा, असे ते म्हणाले.
येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना गेल्या 15 वर्षात 100 कोटी रुपये विशेष अनुदान सुमारे पाच-सहा वेळा आले आहे. ते अनुदान कुठे गेले? बेळगाव शहरात बांधकाम केलेले रस्ते कुठे गेले? असा सवाल त्यांनी केला. बेळगावच्या विकासाबाबत मी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देतो. विकासाच्या मुद्द्यावर खुली चर्चा करण्याचे निमंत्रण देतो. बेळगावात येणारे अनेक प्रकल्प शेजारील जिल्ह्यात गेले आहेत. भाजपने ते आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर काँग्रेसने विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आम आदमीचे जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे, शिवानंद कारी, सुनीता पाटील, विजय पाटील, जुनेद खान यांच्यासह युवक आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments