नंदिनी ब्रँडच्या अमूलमधील कथित विलीनीकरणाच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले.
करवे नारायण गौडा गटाच्या वतीने नंदिनी ब्रँडच्या अमूलमधील कथित विलीनीकरणाच्या विरोधात आज राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ बेळगावातील करवे नारायण गौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शहरात आंदोलन छेडून जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध केला. केएमएफच्या अंजनेय नगरातील नंदिनी प्रकल्पाच्या आवारात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी अमूलच्या उत्पादनांच्या फलकाची होळी करून घोषणाबाजी करून नंदिनी उत्पादनांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे नारायण गौडा गटाचे जिल्हा संचालक दीपक गुडगेनहट्टी यांनी, केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीतील अनेक बँक, संस्था-उद्योगांचे खासगीकरण, विलीनीकरण केले आहे, त्याच पद्धतीने नंदिनी ब्रॅंडचेही विलीनीकरण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तो राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा असल्याचा आरोप केला. करवे हा प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देणार नाही, नंदिनी हा कर्नाटकाचा मानबिंदू आहे, राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा आधार आहे. त्यामुळे राज्यातील खासदार, लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी आणि केंद्राला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी निदर्शक करवे कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने करवे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.


Recent Comments