Belagavi

काँग्रेसचे गॅरंटीकार्ड बोगस; भाजपलाच मिळणार स्पष्ट जनादेश : प्रल्हाद जोशी

Share

काँग्रेसचे गॅरंटीकार्ड बोगस आहे हे लोक जाणतात. त्यामुळे निवडणुकीत भाजपलाच स्पष्ट जनादेश मिळणार असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेळगावात केला.
शहरातील धर्मनाथ भवनात भाजपच्या उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी मतसंग्रह बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेस जनतेला खोटी आश्वासने देण्यात माहीर पक्ष आहे. भाषणातून,जाहीरनाम्यात केवळ खोटी आश्वासने देतो. आतापर्यंत किती आश्वासने त्यांनी पाळली आहेत हे जनतेला माहित आहे. आता एका कुटुंबाला वर्षाला 78 हजार रुपये देतो असे नवे खोटे आश्वासन देत, आधारकार्डांच्या झेरॉक्स कॉपी गोळा करताहेत. पण त्यांना हे शक्य नाही. लोक विश्वास ठेवणार नाहीत म्हणून गॅरंटीकार्ड देत फिरत आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत. कर्नाटकातही सत्ताकाळात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत अशी टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांना राज्यातील 224 मधून एकही मतदारसंघ मिळेनासा झालाय अशी टीका करून जोशी म्हणाले की, एकदा ते वरुणामधून लढतो म्हणतात तर एकदा कोलारमधून लढणार म्हणतात. आता तर पराभवाच्या भीतीने या दोन्ही ठिकाणी लढणार म्हणतात. पित्यासाठी मुलाने मोठा त्याग केल्यास भासवीत आहेत. त्यांनी सर्व 224 मतदार संघातून निवडणूक लढवावी असा उपरोधिक सल्ला जोशी यांनी दिला.

देशात आणि राज्यातही काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्याची टीका करून काँग्रेस हा जनतेने रिजेक्ट केलेला पक्ष असल्याचे प्रल्हाद जोशी म्हणाले. जनतेला दिलेली आश्वासने या पक्षाला पूर्ण करता येत नाहीत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन त्यांनी अजूनही पाळलेले नाही. देशातील कोणत्याही प्रमुख राज्यात त्यांची सत्ता नाही. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही ते सत्तेतून पायउतार होतील. काँग्रेस ही झिरो पार्टी झाल्याची टीका त्यांनी केली.

आमचा पक्ष लोकशाही मूल्ये जपणारा पक्ष आहे. त्यामुळेच उमेदवारी निवडीबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन संभाव्य उमेदवार निवडीची यादी बनविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कौटुंबिक, घराणेशाही चालविणारा पक्ष भाजप नव्हे. लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. साधारण येत्या 6-7 तारखेपर्यंत पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल अशी शक्यता प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली.

एकंदर, काँग्रेस हा जनतेने रिजेक्ट केलेला पक्ष असल्याची बोचरी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलीय.

Tags: