Belagavi

मुंबईतील आझाद मैदानावर दणाणला सीमावासियांचा बुलंद आवाज !

Share

महाराष्ट्रात सामील होण्याच्या अमीट इच्छेने गेल्या 66 वर्षांपासून लढा देणाऱ्या कर्नाटकात खितपत पडलेल्या मराठी भाषिक सीमावासियांचा बुलंद आवाज आज मुंबईच्या आझाद मैदानावर दणाणला. अंतिम टप्प्यात असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडले. यावेळी सीमावासियांच्या एकीची वज्रमूठ अभेद्य राखण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथील आझाद मैदानावर हजारो मराठी भाषिकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन छेडण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार भास्कर जाधव यांच्यासह विविध नेत्यांनी भेट देऊन सीमावासीयांना पाठिंबा व्यक्त केला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, चिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समिती अध्यक्ष मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील, खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, आणि खानापूर तालुका म. ए. समिती चिटणीस, तसेच माजी आमदार दिगंबर पाटील, बिदर म. ए. समिती अध्यक्ष रामराव राठोड, चिटणीस पृथ्वीराज पाटील, निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर आदींची उपस्थिती होती

आंदोलकांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, आताच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही, सीमाप्रश्नी खटल्यात चांगला वकील देणार की नाही असे विचारले. त्यावर त्यांनी हरीश साळवे यांना नेमण्याचा विचार बोलून दाखवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. ३-३ मंत्र्यांची समिती नेमून झाली, तरीही सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय का होतोय असा सवाल आम्ही केला. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांना म. फुले आरोग्य योजनेचा लाभ देऊ केलाय, वेगवेगळ्या प्रकारे अनुदान देतेय. पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही. तुम्ही सीमावासियांनी प्रश्नांची तड लागेपर्यंत एकीची वज्रमूठ भक्कम ठेवा असे आवाहन त्यांनी केले. बाईट
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने आजवर आपली भूमिका विविध माध्यमातून मांडली आहे.अनेक प्रस्ताव आणि ठराव मांडून ते मंजूर केले आहेत. आजवर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक लढे, आंदोलने उभारण्यात आली. मात्र महाराष्ट्राचे लक्ष वेधून सीमाप्रश्नाचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी मुंबईमध्ये आंदोलन छेडण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यानुसार कर्नाटकाला महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे हे या आंदोलनातून दिसावे, आणि महाराष्ट्रात केवळ ठराव नको आता कृती झाली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले, महाराष्ट्रात जाण्याच्या आशेने हे सीमाबांधव येथे जमले आहेत. महाराष्ट्रातील लोकांची आम्हाला साथ आहे म्हणून आम्ही येथे आलो आहोत. महाराष्ट्राला आमच्याबरोबर नेण्यासाठी हे आंदोलन आहे. आम्ही येथे महाराष्ट्राला विनंती करायला आलो आहोत की न्यायालयात खटला भरला म्हणजे सीमाप्रश्न सुटला असे नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. त्याला बळ द्यावे लागते असे सांगून महाराष्ट्राने ते अत्यंत प्रभावीपणे करावे हीच आमची मागणी आहे, असे दीपक दळवी यांनी स्पष्ट केले.

रमाकांत कोंडुसकर, सरस्वती पाटील, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर आदींसह विविध समिती नेत्यांनी आणि मान्यवरांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में आदी घोषणा देत सीमाभागातील मराठी भाषिकांनी मुंबईचे आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. आंदोलनात बेळगाव, खानापूर, निपाणी, बीदरसह संपूर्ण सीमाभागातून आलेल्या हजारो सीमावासियांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Tags: