Belagavi

मानवाच्या स्वार्थापासून पर्यावरणाच्या रक्षणाची गरज : डॉ. घोरपडे

Share

मानवाच्या स्वार्थामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊन न भूतो नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्या टाळण्यासाठी मानवाच्या स्वार्थापासून पर्यावरणाच्या रक्षणाची गरज असल्याचे मत केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रवीण घोरपडे यांनी व्यक्त केले.

बेळगावातील आरएलएस विज्ञान महाविद्यालयात फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे कर्नाटक राज्य विज्ञान परिषदेच्या डॉ. एस. जे. नागलोतीमठ विज्ञान केंद्राच्या सहकार्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. प्रवीण घोरपडे पुढे म्हणाले, जगभरात वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचा वापर, नैसर्गिक संसाधनांचे प्रदूषण यामुळे कधी नव्हे इतक्या नैसर्गिक आपत्तींना सर्वच देशांना तोंड द्यावे लागत आहे. भूस्खलन, भूकंपांचे प्रमाण वाढले आहे. ते टाळण्यासाठी युद्धपातळीवर पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञांनी याबाबत अनेकदा सूचना देऊन देखील माणूस सावध होताना दिसत नाही. त्यामुळे याचा फार मोठा फटका पुढील पिढयांना निश्चित बसेल असा इशारा त्यांनी दिला.

प्रारंभी डॉ. प्रवीण घोरपडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शंका निरसन केले. प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर, मेघा गलगली, डॉ. जी. ए. बिरादार, व्ही. के. गानिगेर, डॉ. के. एस. ब्याडगी, ए. एस. पुजार, के. बी. हिरेमठ तसेच विध्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते

Tags: