Belagavi

सिद्धरामय्या कुठूनही लढले तरी त्यांचा पराभव निश्चित : कारजोळ यांचे भाकीत

Share

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोणताही मतदारसंघ मिळणार नाही. कोणत्याही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, असे भाकीत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी वर्तवले आहे.

मंत्री गोविंद कारजोळ यांनी आज, सोमवारी बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या यांना कुठेही विजय मिळणार नाही, असे सांगितले. कोलारमधून त्यांनी निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. काँग्रेसची परिस्थिती अशी झाली आहे की, सिद्धरामय्या कुठूनही लढले तरी ते जिंकणार नाहीत. निवडणुका जवळ आल्यावर सिद्धरामय्या यांनी मतदारसंघ बदलणे स्वाभाविक आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसला आता देशात स्थान नाही. घरात दिवा पेटवायला दिशा नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेसच्या मनस्थितीमुळे अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला आहे. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे..? एस. एम. कृष्णा यांनी कर्नाटकात पक्ष सोडला आहे. त्यामुळे आणखी अनेक जण काँग्रेस सोडण्याचा विचार करत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले असते तर दलितांना सन्मान दिल्यासारखे झाले असते. मात्र, आता पडझडीच्या काळात काँग्रेसने जे काही दिले त्याची किंमत नाही, अशी टीका कारजोळ यांनी केली.

‘विवेक’ योजनेंतर्गत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला 245 वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी 36 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. आता जिथे प्राथमिक शाळांसाठी खोल्यांची गरज आहे, त्यांच्या बांधकामाचे आज भूमिपूजन करत आहोत. काही खोल्यांच्या देखभालीचा खर्चही भरण्यात आला आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 275 खोल्या मंजूर केल्या असून, त्यासाठी 39 कोटी मंजूर झाले आहेत. आजपासून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विवेक योजनेंतर्गत शाळा खोल्यांचे बांधकाम एकाच वेळी सुरू करत आहोत असे ते म्हणाले.

दरम्यान, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या ‘हिंदू’ शब्दाबाबतच्या विधानावर भाष्य करण्यास मंत्री कारजोळ यांनी नकार दिला.

Tags:

his defeat is certain No matter where Siddaramaiah fights from